मुंबई - राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी अचानक फोनवरून सकाळी अकरा वाजताची भेट मागितली. त्यांची सकाळपासून वाट पाहत आहोत. परंतु आपली भेट न घेता त्यांनी भाजपाच्या नेत्यांना भेटण्याचा सिलसिला सुरू केला आहे. त्यामुळे शर्मा यांनी राज्यात येऊन राजकारण सुरू केले असल्याचा आरोप राज्याच्या महिला व बाल कल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी प्रोटोकॉलनुसार माझी अधिकृत भेट मागितली नव्हती. पण काल रात्री अचानक फोनकरून आज सकाळी 11 वाजता भेटण्याचे ठरवले. मी सकाळपासून सर्व कामे बाजूला ठेवून त्यांची वाट पाहते आहे परंतु त्या आल्याच नाहीत. यामुळे त्यांना राज्यातील महिलांच्या प्रश्नांपेक्षा राजकारणात जास्त रस असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.
रेखा शर्मा यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खात्याची मंत्री म्हणून माझी भेट घेणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. यावरूनच भाजपा महिलांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले. राज्यसरकार महिलांच्या प्रश्नासंदर्भात गंभीर आहे. परंतु, भाजपाकडून केवळ राजकारण करण्यापलीकडे काहीही केले जात नाही. महिलांच्या प्रशांबाबत राज्यात वेगवेगळ्या आढावा बैठका घेण्याचे काम सुरू आहे. शिवाय विविध संस्थांसोबतही बैठका होत आहेत. विरोधकांना ते दिसत नाही, त्यांना फक्त टीका आणि राजकारण करता येते, असे ठाकूर म्हणाल्या.
महिला लोकल सेवेसाठी रांग लावून उभ्या राहतात, त्यांना धक्का बुक्की होते. त्यामुळे राज्य सरकारने मुंबईत महिलांसाठी लोकल सुरू करावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र, केंद्राकडून त्याला अद्यापपर्यंत प्रतिसाद मिळालेला नाही. याबाबत गुरुवारी पुन्हा बैठक होणार आहे. महिला लोकलसंदर्भात काय उपाययोजना केल्या जातील त्यावर चर्चा केली जाईल. महिलांसाठी लोकल चालू सुरू करण्यावरूनही राजकारण केले जात आहे. असे करणे योग्य योग्य नाही परंतु भाजपाचा तो स्वभावच असल्याचा टोलाही यशोमती ठाकूर यांनी लगावला आहे.