मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील एक मोठा नेता अजित पवार यांच्या सोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याच्या वावड्या उठल्या. यानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. आता यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील यांनी आधीच अजित पवारांसोबत यायला हवं होतं. मात्र त्यांनी आता निर्णय घेतला असेल तर ते आमच्या दृष्टीने चांगलं असल्याचे उदय सामंत म्हणाले.
'जयंत पाटील यांचा निर्णय माहीत नाही' : 'अजित पवारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय गतिमान पद्धतीने काम करत आहेत. खरंतर जयंत पाटील यांनी आधीच अजित पवारांसोबत यायला पाहिजे होतं. ते का मागे राहिले याची मला कल्पना नाही. आमचे गतिमान सरकार आल्यानंतर त्यांना याची जाणीव झाली. अजित पवार गेल्यानंतर जयंत पाटील यांनी पंधरा दिवस अभ्यास केला असेल. त्यामुळे कदाचित ते हा निर्णय घेत असतील, मात्र निर्णय घेतला की नाही याची मला माहिती नाही', असे सामंत म्हणाले.
खातेवाटपावर काय म्हणाले उदय सामंत : राज्यातील मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. 'मी एवढ्या मोठ्या स्तरावर चर्चा करत नाही. मी सामान्य कार्यकर्ता आहे. हा विषय मुख्यमंत्र्यांचा व उपमुख्यमंत्र्यांचा आहे', असे ते म्हणाले.
'औरंगजेबाला नायक बनवणे महाराष्ट्राचे दुर्दैव' : ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरही उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. 'ज्या व्यक्तीने शिवाजी महाराजांना आणि महाराष्ट्राला त्रास दिला, तो महाराष्ट्राचा शत्रू आहे. औरंगजेबाला नायक बनवणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. औरंगजेब हा खलनायक होता आहे आणि तो खलनायकच राहील. शिवाजी महाराजांना त्रास देणार आपला मित्र कधीच असू शकत नाही', असे स्पष्ट मत उदय सामंत यांनी व्यक्त केले.
पूर्वी संताजी-धनाजी दिसायचे, आता शिंदे-फडणवीस दिसतात : संभाजी भिडे यांच्यावरील कारवाई संदर्भात उदय सामंत यांना विचारण्यात आले. त्यावर, विधिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सविस्तर बोलले आहेत. संभाजी भिडे नेमके काय बोलले त्याची चौकशी केली जाईल आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. काही लोकांना पूर्वीच्या काळात जसे संताजी-धनाजी दिसायचे तसे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिसत असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
हेही वाचा :