मुंबई : महाराष्ट्र राज्यात सुमारे 400 पेक्षा अधिक गड किल्ले आहेत. याच्यापैकी अनेक किल्ले हे जीर्ण अवस्थेत आणि पडझड झालेल्या स्थितीत आहेत. या सर्व गडकिल्ल्यांची दुरुस्ती व्हावी यासाठी दुर्गप्रेमी संघटना सातत्याने प्रयत्न करीत असतात. राज्यातील या गडकिल्ल्यांसंदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.
राज्यातील तीनशे गड किल्ले असंरक्षित : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे चारशे गडकिल्ले असून त्यापैकी 59 किल्ले राज्य संरक्षित स्मारके म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तर 47 किल्ले केंद्र संरक्षित स्मारके म्हणून घोषित करण्यात आली आहेत. गडकिल्ल्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून त्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील याबाबत विचार सुरू असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
गडकिल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद : राज्यातील अनेक किल्ल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून पुणे जिल्ह्यातील सिंहगड मंगळवेढा येथील भुईकोट किल्ला तर रायगड जिल्ह्यातील अवचित गड मुंबईतील सायन किल्ला यांचे मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे मुनगंटीवार यांनी मान्य केले आहे. राज्यातील राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन आणि दुरुस्तीसाठी दरवर्षी राज्यस्तरावर आवश्यक ती तरतूद करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षीही जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पुढील वर्षापासून तीन वर्षासाठी तीन टक्के निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. तसेच ज्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाबाबत मागणी पत्रे आली आहेत त्यानुसार त्याच्या गड किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम निविदा स्तरावर सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
महा वारसा सोसायटी स्थापन करणार : राज्यातील गड किल्ल्यांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने दुर्ग प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि जाताना साठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी ही दुर्गप्रेमी संघटनांकडून करण्यात येत आहे. मात्र, या संदर्भात राज्य सरकारने दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्याबाबत अद्याप कोणताही विचार केलेला नाही. या स्मारकांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासकीय निधीसह खाजगी स्त्रोतांमधूनही निधी वापरता यावा, यासाठी स्थानिक पातळीवरील कामांमध्ये जनतेचा सहभाग वाढावा या दृष्टीने जिल्हास्तरावर जतन आणि संवर्धन सुनियोजित व्यवस्थापन होण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महा वारसा सोसायटी स्थापन करण्याचा प्रस्ताव असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
सर्व किल्ले संरक्षित करावेत : मावळा प्रतिष्ठानचे अभी भालबर यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, महाराष्ट्रातील सर्व किल्ले हे संरक्षित व्हावेत, अशी आम्ही सातत्याने सरकारकडे मागणी करीत आहोत. सरकारने स्थापन केलेल्या समितीकडे ही आमची हीच मागणी आहे सर्व किल्ले संरक्षित करून गड किल्ल्यांचे जतन करावे आणि दुर्गप्रेमी नागरिकांना दिलासा द्यावा.