मुंबई - गोरेगांव येथील नेस्को मैदानावरील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या जंबो कोविड सेंटरमधील दुसऱया टप्प्याचा भाग म्हणून 1 हजार 500 बेड्स उभारण्यात आले आहेत. त्यापैकी 200 बेड्सचे लोकार्पण राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज (दि. 3 मे) सायंकाळी करण्यात आले. उर्वरित बेड्सचे लोकार्पण टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या पंधराशे बेड्सपैकी 1 हजार बेड्स ऑक्सिजन पुरवठा सुविधेसह उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नवीन क्षमतेसह नेस्को कोविड केंद्राची क्षमता आता 3 हजार 700 बेड्स इतकी झाली आहे.
1500 नवे बेड्स
गोरेगांव नेस्को कोविड सेंटरमधील ई सभागृहात एकूण 1 हजार 500 बेड्स कोविड बाधित रुग्णांवरील उपचारासाठी नव्याने कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये 1 हजार बेडस ऑक्सिजन पुरवठा सुविधेसह तर उर्वरित 500 सर्वसाधारण बेड्स आहेत. प्रत्येक बेडजवळ पंखा, लॉकर व खुर्ची पुरवण्यात आली आहे. आज 200 बेड्स कार्यान्वित करुन या सभागृहातील सेवेचा प्रारंभ करण्यात आला असून टप्प्या-टप्प्याने सर्व बेड्स कार्यान्वित केल्या जाणार आहेत. या नवीन सुविधेसाठी एकूण 1 हजार 100 मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत. त्यात 50 सिनियर कन्सल्टंट, 160 निवासी वैद्यकीय अधिकारी, 320 परिचारिका, 480 रुग्णसेवा सहायक आणि 90 तांत्रिक कर्मचारीवर्ग यांचा समावेश आहे.
असे आहे कोविड सेंटर
'ई' सभागृहात एकूण सहा कक्ष आहेत. प्रत्येक कक्षामध्ये 250 ते 300 बेड्सची क्षमता आहे. सर्व कक्षांमध्ये वातानुकूलन सुविधा आहे. तसेच प्रत्येक कक्षामध्ये 2 नर्सिंग स्टेशन, 1 अन्न वितरण विभाग, 1 अग्नि नियंत्रण कक्ष, समवेत चोविस तास तत्त्वावर कार्यरत फार्मसी कौन्सिलिंग रूम, रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती पुरवण्यासाठी नियंत्रण कक्ष देखील आहे. एकूण 8 नोंदणी कक्ष, १ निरीक्षण कक्ष (10 बेड्स), 1 क्ष-किरण विभाग कार्यान्वित करण्यात आले आहेत.
एकूण 3 हजार 700 बेड्स
नेस्को कोविड केंद्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 2 हजार 200 बेड्स कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 200 एचडीयू बेड्स तर 300 ऑक्सिजन पुरवठा सुविधा असलेले बेड्स होत्या. दुसऱ्या टप्प्यातील 1 हजार 500 बेड्ससह या केंद्राची एकूण क्षमता 3हजार 700 बेड्स इतकी झाली आहे. परिणामी, मुंबईतील कोविड बाधितांवरील उपचारांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजिव जयस्वाल, उपायुक्त संजोग कबरे, डॉ. नीलम अंद्रादे, डॉ. राजेश डेरे, डॉ. नितीन सलागरे उपास्थित होते.
हेही वाचा - आज मुंबईत कोरोनाचे 2662 नवे रुग्ण; 78 रुग्णांचा मृत्यू