मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शितल मात्रे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रफीत मॉर्फिंग करून वायरल केल्याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
विधानसभेत मुद्दा उपस्थित : शिवसेनेच्या नेत्या आणि प्रवक्त्या शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या संदर्भातील एक व्हिडिओ क्लिप व्हायरल करून बदनामी केल्या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात शितल म्हात्रे यांनी तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात संबंधितांवर कडक कारवाई करावी आणि एसआयटी स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी आमदार यामिनी जाधव आणि आमदार मनिषा चौधरी, भारती लव्हेकर यांनी आज विधानसभेत केली होती. यासंदर्भात दिवसभरात अहवाल घेऊन निवेदन केले जाईल, असे शासनाने सांगितले होते.
चौघांना अटक : दरम्यान, याप्रकरणी पोलीसांनी गंभीर दखल घेत कारवाई केली असून चार आरोपी ताब्यात घेतले आहेत. अशोक अशोक राजदेव मिश्रा, मानस अनंत कुवत, नायक भगवान डावरे तसेच रविंद्र बबन चौधरी यांना अटक करून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. याप्रकरणी चौघांना न्यायालयात सादर केल्यानंतर त्यांना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी चार मोबाईल हँडसेट आणि पाच सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. सदर व्हिडिओचे एडिटिंग आणि मॉर्फिंग केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. विनायक डावरे ठाकरे गटाचा सोशल मिडिया स्टेट कॉर्डिनेटर असून त्याने सदर व्हिडिओ मातोश्री फेसबुक पेजवर अपलोड केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
एसआयटी स्थापन : शीतल म्हात्रे मॉर्फिंग व्हिडीओ व्हायरल प्रकरणी तपासासाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत. सदर गुन्ह्यातील सूत्रधार शोधण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. तसेच याबाबत तपास करण्यात येत असून वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करून पुढील तपास केला जाणार असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाई यानी दिली आहे.