मुंबई Nilesh Rane Retirement : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी विजयादशमीच्या दिवशी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे राणे कुटुंब आणि भाजपामध्ये सारं काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालं. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढत्या हस्तक्षेपांमुळे निलेश राणे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात झडत होत्या. मात्र मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सकाळीच राणेंच्या बंगल्यावर दाखल होत निलेश राणे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांना घेऊन 'सागर' बंगल्यावर धडक देत त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा घडवून आणली.
निलेश राणे यांची सगळ्यांकडून मनधरणी सुरू : माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर त्यांच्या निवृत्तीचे पडसाद कुडाळमध्ये पाहायला मिळाले. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू इथल्या 'अधीश' बंगल्यावर मंत्री रवींद्र चव्हाण हे निलेश राणे यांची भेट घेण्यासाठी सकाळी साडेसात वाजता पोहोचले. दोघांनामध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली. या बैठकीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची नाराजी कशामुळे आहे, याबाबत चर्चा केली. त्यानंतर निलेश राणे हे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या गाडीतून बाहेर पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मंत्री रवींद्र चव्हाण हे निलेश राणे यांना घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर निवासस्थानी गेले. तिथं त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली.
'सागर' बंगल्यावर राणे, चव्हाणांमध्ये खलबतं : ऐन निवडणुकीच्या तोंडावर निलेश राणे यांनी घेतलेला निर्णय भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकतो. अशा प्रकारच्या निर्णयामुळे कोकणातील राणे समर्थक आणि भाजपा समर्थकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे निलेश राणे यांच्या मनधरणीचं काम सध्या सुरु आहे. आपल्या निर्णयावर फेरविचार करून राजकारणातून निवृत्तीचा निर्णय मागं घ्यावा, अशी विनंती निलेश राणे यांना करण्यात आली आहे.
आक्रमक नेतृत्वाची कोकणाला गरज : कोकणातील मतदारसंघात निलेश राणे यांची जबरदस्त पकड आहे. आक्रमक नेतृत्व म्हणून निलेश राणे हे कोकणात परिचित आहेत. आपण घेतलेला निर्णय मागं घ्यावा, अशी त्यांना मी वैयक्तिक विनंती केली आहे. तुमच्यासारख्या आक्रमक नेत्याची कोकणाला आवश्यकता आहे. अशा प्रकारची विनंती मित्र म्हणून आपण केली असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
रवींद्र चव्हाण यांचा मतदारसंघात वाढलेला हस्तक्षेप? : रवींद्र चव्हाण यांचा मतदारसंघात वाढता हस्तक्षेप हा कळीचा मुद्दा झाल्याने निलेश राणे यांना राजकारणातून निवृत्तीचा निर्णय जाहीर करावा लागला, असं बोललं जात आहे. गेल्या अनेक महिन्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात वाद सुरू असल्याचंही समोर येत आहे. कुडाळ, मालवण मतदार संघातून निलेश राणे निवडणुकीच्या तयारी निमित्तानं मतदारसंघात तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडं अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपासोबत आल्यानं कुडाळ मालवण मतदारसंघ नेमका कोणाच्या वाट्याला जातो, याबद्दल अनिश्चितता असल्यामुळेचं निलेश राणे यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा :