मुंबई : 'नाशिकच्या झाकीर हुसैन रुग्णालयात टँकमधून ऑक्सिजन गळती झाली. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. पण यामुळे व्हेंटिलेटरवर असणाऱ्या 22 रुग्णांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी. ऑक्सिजन पुरवठ्याअभावी असे मृत्यूचे थैमान राज्यात इतर कुठेही पुन्हा घडू नये. याची खबरदारी राज्य सरकारने घ्यावी', असे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
तसेच, राज्यातील सर्व रुग्णायलयात असणाऱ्या ऑक्सिजन टँकची पाहणी करून ऑक्सिजन पुरवठ्यात खंड पडणार नाही याची खबरदारी घ्यावी. ऑक्सिजन टँक दुरुस्तीकडे लक्ष द्यावे. टँक लिकेजमुळे इतकी भीषण घटना घडली. या घटनेवरून संपूर्ण राज्यात चिंतेचे वातावरण आहे. पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी राज्य सरकारने खबरदारी घ्यावी, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.