मुंबई - 7 मेला राज्य सरकारकडून पदोन्नती आरक्षणाबाबतचा जीआर काढण्यात आला, हा जीआर रद्द करावा, अशी काँग्रेसची आग्रही भूमिका असल्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक विधान भवनात पार पडली. या बैठकीला ऊर्जा मंत्री नितीन राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे उपस्थित होते. या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये चर्चा सुरू असून सकारात्मक मार्ग निघेल, असा विश्वास बैठकीनंतर नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे.
बैठकीत झाली चर्चा
7 मेला राज्य सरकारने काढलेला पदोन्नती आरक्षणाबाबतचा जीआर रद्द केला पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. आज (गुरुवार) राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार असून राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत काँग्रेस आक्रमक होणार आहे. या बैठकीत पदोन्नती आरक्षणाबाबत नेमकी काँग्रेसकडून काय भूमिका मांडण्यात यावी, यासंबंधी चर्चा करण्यासाठी काँग्रेस मंत्र्यांनी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीआधी बैठक बोलावली होती. विधान भवनात काँग्रेस मंत्र्यांची ही बैठक पार पाडली. या बैठकीत पदोन्नती आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेवर चर्चा केली गेली. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी किमान समान कार्यक्रमांतर्गत राज्य सरकारचा कारभार चालेल असे ठरवले होते. मात्र पदोन्नती आरक्षण थांबवण्याबाबत राज्य सरकारने जो जीआर काढला आहे. तो जीआर किमान समान कार्यक्रम अंतर्गत येत नाही, अशी भूमिका ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह काँग्रेसच्या काही मंत्र्यांनी मांडली आहे.
हेही वाचा-हेड कॉन्स्टेबल सुखबीरने 'सेवा, सुरक्षा और सहयोग' ला प्रत्यक्षात उतरवले