मुंबई - पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून मोदी सरकार लोकांचे खिसे कापत आहे, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. तसेच यानिमित्ताने हे सरकार पाकिटमार सरकार बनले आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते येथे माध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच आहेत. काही जिल्ह्यात पेट्रोलचा दर शंभरावर पोहोचला आहे. जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत, हे मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली. आता कोरोनाचे संकट असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे याचे पडसाद महागाई वाढण्यावर होत आहेत. त्यामुळे लोकांची लूट थांबवावी आणि जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत, तेच भारतात असावेत, असे अशी मागणीही मलिक यांनी केली.
दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या संकटात इंधनाच्या दरवाढीमुळेही जनता त्रस्त झाली आहे. तसेच याप्रकरणी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनही करण्यात आले.