मुंबई - हिंदूंना कोणी शिव्या देत असेल, तर त्या ऐकून घेतले जाणार नाही, आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. आम्ही आघाडी केली आहे, पण अजूनही आम्ही कपाळावर टिळा लावतो, अशा कडक भाषेत शरजील प्रकरणात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानीने हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर पुणे पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत पाटील यांचे योगी आदित्यनाथ यांना पत्र
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून शरजील प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकार या संदर्भात काही पाऊल उचलत नसल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. तसेच या प्रकरणी गुन्हा नोंदवावा, अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मात्र, योगी आदित्यनाथ यांना शिवाजी महाराजांची पूजा करताना चपला काढून ठेवायचे हेही माहित नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार, अशी टीका पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
राम मंदिराच्या नावाखाली खंडणी मागणे चुकीचे
राम मंदिर उभारणीच्या नावाखाली खंडणी मगितल्यावरुन यवतमाळमध्ये गुन्हा दाखल झाला असून, राम मंदिर उभारणीच्या नावाखाली जर कोणी खंडणी गोळा करत असेल तर ते साफ चुकीचे असून त्यावर कारवाई केली गेली पाहिजे, असे मत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. राम मंदिर उभारणीसाठी वर्गणी मागण्यात काहीही हरकत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - लवकरच महिलांसाठी अत्याधुनिक फिरता दवाखाना - राजेश टोपे