मुंबई - मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हेच वाईट राजकारण आहे. पुराव्याशिवाय आरोप करणे म्हणजे मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, अशा शब्दात मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्ये प्रकरणात विरोधकांकडून सातत्याने पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे. यावर बोलताना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पुरावे असतील तर समोर घेऊन यावेत पुराव्याशिवाय आरोप करणे म्हणजे गलिच्छ राजकारण आहे. मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे अति वाईट राजकारणाचा कळस आहे.
यावेळी त्यांना मराठा आरक्षणाबाबत विचारले असता मंत्री शिंदे म्हणाले, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित काम सुरू आहे. लढाई सरकार निश्चितपणे जिंकेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मागील सरकारच्या काळात मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्यांच्या वारसांना दहा लाख रुपये मदत आणि एसटीमधील नोकरी या घोषणेची अंमलबजावणी हे सरकार करणार आहे, अशी माहितीही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
त्यांना वाढीव वीज बिलांबाबत विचारले असता ते म्हणाले, वाढीव वीज बिलामुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार, अशी माहिती शेवटी मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.