मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. अनेक मुद्द्यांवर हे अधिवेशन गाजत असताना शालेय शिक्षण व भाषा मंत्री, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा आज वाढदिवस. विधान परिषदेमध्ये सभागृहाकडून केसरकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. परंतु प्रश्नोत्तराच्या तासात त्यांच्या विभागाचे प्रश्न चर्चेला असताना दोन्ही बाजूच्या सदस्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. १ तासाच्या प्रश्नोत्तराच्या तासात एकूण ६ प्रश्न चर्चेला आले. त्यात केसरकर यांच्या शालेय शिक्षण विभागाचे ३ प्रश्न होते.
कुठले प्रश्न चर्चेला आले?
१) शैक्षणिक वर्ष सन २०२२ -२३ करिताच्या संच मान्यतेच्या पाक्रियेत राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध आढळून आल्याबाबत
२) शाळांना प्रचलित धोरणानुसार अनुदान देण्याबाबत
३) राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करणेबाबत
'या' आमदारांनी उपस्थित केले प्रश्न : वरील प्रश्नांवर आमदार किरण सरनाईक, आमदार विक्रम काळे, आमदार सतेज पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार कपिल पाटील, आमदार सत्यजित तांबे, आमदार किशोर दराडे यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत मंत्री केसकरांवर प्रश्नांचा भडीमार केला. भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी प्रश्न उपस्थित करत आज मंत्री महोदयांचा वाढदिवस असून आपल्या उत्तरात ते वाढदिवसानिमित्त त्यांना दिलेल्या शुभेच्छाचं रिटर्न गिफ्ट म्हणून चांगले उत्तर देतील, अशी भावना बोलून दाखवली.
शांत, संयमाने मुद्देसूद उत्तरे : केसरकरांनीसुद्धा सभागृहात आमदारांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना शांत व संयमाने मुद्देसूद उत्तरे दिली. कर्मचाऱ्यांना अनुदान देण्याच्या मुद्यावर कागदपत्रे जमा करावीच लागणार. विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची पडताळणी करावीच लागणार. तसेच शिक्षकांना कॅशलेस सुविधा देणे शक्य नसल्याचे सांगितले. काही मुद्द्यांवर केसरकरांनी दिलेल्या उत्तराने काही आमदारांचे समधान झाले नाही. त्या आमदारांसोबत विशेष बैठक घेण्याची सूचना सभापतींनी केली. एकूणच केसरकरांना वाढदिवशी आमदारांच्या प्रश्नांच्या भडीमाराला सामोरे जावे लागले; पण केसरकरांनी दिलेल्या उत्तरात त्यांचा हजर जबाबीपणा पण दिसून आला. त्याचे आमदारांनी कौतुकही केले.
हेही वाचा: