मुंबई: नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून बेलापूर जेट्टी ते दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापर्यंत वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आज याचे उद्घाटन झाले. या वॉटर टॅक्सी सेवेमुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. या सेवेमुळे बेलापूरहून दक्षिण मुंबईत पोहोचायला किमान दोन तास वेळ लागतो. आता या सेवेमुळे अवघ्या 50 मिनिटांत या जलमार्गाने दक्षिण मुंबईत पोहोचणे शक्य होणार आहे. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडची ही वातानुकूलित वॉटर टॅक्सी सेवा दक्षिण मुंबईला-नवी मुंबईशी जोडणार आहे. बेलापूर-गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सीमुळे प्रवाशांचा वेळही वाचेल आणि पैशांची बचत होणार आहे.
अशी असेल टॅक्सी सेवा : नवी मुंबईतून चालणाऱ्या वॉटर टॅक्सी शहराला मुंबई, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, एलिफंटा लेणी आणि रेवस यांना जोडतील. या सर्व सेवा टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केल्या जातील. वॉटर टॅक्सी, 'नयन एक्स एल' मध्ये खालच्या डेकवर 140 प्रवासी आणि वरच्या किंवा बिझनेस क्लासच्या डेकवर अतिरिक्त 60 प्रवासी बसू शकतील. ही टॅक्सी बेलापूरहून सकाळी 8.30 वाजता निघेल आणि 9.30 वाजता गेटवे ऑफ इंडियाला पोहोचेल. त्यानंतर वॉटर टॅक्सी संध्याकाळी 6.30 वाजता नवी मुंबईसाठी निघेल आणि संध्याकाळी 7.30 वाजता ती बेलापूर जेट्टीवर पोहोचेल अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.
प्रवाश्यांसाठी विशेष सुविधा : गेटवे ते बेलापूर दरम्यान वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवार म्हणजे आठवड्यातील पाच दिवस धावणार आहे. तिकीट दर 300 रुपये असणार आहे. बोटीमध्ये एकूण 200 प्रवाशी घेऊन जाण्याची क्षमता असेल. टॅक्सीमध्ये वर आणि खाली अशा दोन्ही ठिकाणी प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. तसेच नोकरदार वर्गांना पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आम्हाला व्देषभावनेने बोलायचे नाही: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देऊन वरळीतून माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान दिले होते. त्याविषयी दादा भुसे यांना विचारले असता लोकांना या गोष्टींमध्ये स्वारस्य नाही. गेली पंचवीस तीस वर्षे आम्ही एकत्र काम केलेला आहे. जेव्हा आम्ही त्यांच्या सोबत होतो तोपर्यंत आम्ही सगळे चांगले होतो आणि एका घटनेमुळे एका दिवसामध्ये आम्ही सगळे नालायक झालो. समाजात अनेक प्रश्न आहेत. त्यावर संघटितपणे काम करण्याची गरज आहे; मात्र ते आपण बाजूला ठेवतो आणि तू इकडे ये, मी तिकडे येतो असे करत आहेत. ज्याला करायचे ते बोलत नाही. आम्ही कामावर विश्वास ठेवतो. आम्हाला त्यांच्याविषयी देखील द्वेष भावनेने बोलायचे नाही. कारण पंचवीस तीस वर्षे आम्ही ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केल आहे, असेही या उद्घाटनप्रसंगी दादा भुसे यांनी म्हटले.