मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
नोटीशीला कायदेशीर उत्तर देऊ
तर, 'ईडीने १०० कोटींच्या कथित वसुलीसंदर्भात नोटीस बजावली आहे. मंगळवारी (31 ऑगस्ट) सकाळी ११ वाजता ईडीच्या मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या नोटिशीला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ', असे परब यांनी म्हटले आहे.
नोटीशीत कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख नाही - परब
'आज संध्याकाळी मला ईडीची नोटीस मिळाली आहे. त्यात कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे नोटीस कशासी संबंधित आहे? हे मला सांगता येणार नाही. जोपर्यंत प्रकरण कळत नाही, तोपर्यंत काहीही सांगणं कठीण आहे. नोटीशीमध्ये फक्त इन्व्हेस्टीगेशनचा पार्ट असल्याचा उल्लेख केला आहे. नोटीसला आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ. मला कारणं कळली पाहिजे. मी या प्रक्रियेवर कायदेशीर पद्धतीने अभ्यास करुन ईडी चौकशीला सामोरं जाण्याबद्दल निर्णय घेईन. नोटीस कायदेशीर आलेली आहे, त्याला कायदेशीर उत्तर दिलं जाईल. नोटीशी मागचं कारण काय हे जेव्हा समजेल तेव्हा आम्ही उत्तर देऊ', असे परब यांनी म्हटले आहे.
यात्रा संपताच वरचे सरकार कामाला लागले - राऊत
'शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू, जय महाराष्ट्र!', असं म्हणत संजय राऊत यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सचिन वाझेमुळे अनिल परब संकटात
अनिल परब यांनी ईडीने नोटीस बजावून उद्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेने त्याच्या जबाबात अनिल परब यांचे नाव घेतले होते. त्यानंतर परब ईडीच्या रडावर आले आहेत. दरम्यान, सचिन वाझे अँटिलिया बाहेरील स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणात अटकेत आहे. त्याने एनआयए कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. सध्या तळोजा कारागृहात असलेल्या सचिन वाझेला अटक केल्यानंतर 90 दिवसात एनआयएकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. याचाचा आधार घेत वाझेने आता जामिनासाठी अर्ज केला आहे.
हेही वाचा - अनिल परब यांच्या 'ईडी' नोटीसवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...