मुंबई - पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व शैक्षणिक परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मोदींना आदित्य ठाकरे यांनी विनंती केली. मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने कोविड 19 महामारी विरोधात जोरदार झुंज दिली असून नागरिक कोविडशीही लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचेही ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधानांना विनंती करून त्यांचे लक्ष विद्यार्थ्यांच्या परिस्थितीकडे वेधले आहे. दिवसेंदिवस कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता अजूनही देशात अनेक राज्यांमध्ये घरातून काम सुरू आहे. अनेक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांनी त्यांच्या व्यावसायिक व इतर परीक्षांचे वेळापत्रक ठरवण्याचे प्रयत्न सुरू केलेत. हे प्रत्यक्ष व व्यवहार्य पर्याय नाही. अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रेड झोनही कायम असून अद्याप वाहतूक पूर्ववत झाली नाही.
जेव्हा जगात शाळा कॉलेज पुन्हा सुरू होतील तेव्हा मोठया संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे अशी भीती देखील आदित्य ठाकरे यांनी पत्रातून व्यक्त केली.
आपल्या देशात बहुतांश विद्यार्थी पालक व त्यांचे आजी आजोबा यांच्या सोबत राहतात, अशावेळी संक्रमण होण्याचा धोका अधिक आहे. एका पेपरसाठी असलेल्या प्रणालीमध्ये केवळ विद्यार्थीच नसून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बरेच काही राज्य यंत्रणेचा समावेश आहे, त्यातील बहुतेकजण हे उच्च जोखीम गटात आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.
आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली की, यात त्यांनी हस्तक्षेप करून सर्व शैक्षणिक घडामोडी पुढे ढकलण्यात याव्यात. सर्व व्यावसायिक परीक्षा, एन्टरन्स परीक्षा या सर्व ऑनलाइन घेण्यात याव्यात. व्यावसायिक नसलेल्या अभ्यासक्रमांसाठी त्यांचे बहुतेक शैक्षणिक मूल्यांकन केले गेले आहे आणि अंतिम परीक्षा 10% पेक्षा जास्त मूल्यांकन नसते. म्हणूनच ते विद्यापीठाने तयार केलेल्या मार्किंग सिस्टमवर जाऊ शकतात, याकडेही पंतप्रधान मोदींचे लक्ष वेधले.
शैक्षणिक वर्ष हे जून जुलै ऐवजी जानेवारी 2021 ला सुरू करता येईल का याबाबतही आम्ही विचार करत आहोत. मला खात्री आहे की तुमच्या या हस्तक्षेपामुळे आपण संसर्गाच्या मोठ्या प्रमाणात वाढ रोखू आणि आपल्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यात आपल्या लढायला हातभार लावू असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.