नवी दिल्ली Milind Deora : मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी पक्षाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला. मनमोहन सरकारच्या काळात देवरा केंद्रात मंत्री होते. मात्र त्यांच्या जाण्यानं महाविकास आघाडीवर जास्त परिणाम होणार नाही, असा दावा काँग्रेसनं केला आहे.
महाविकास आघाडीवर परिणाम होणार का : "मिलिंद देवरा यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातील काँग्रेस किंवा महाविकास आघाडीवर कमीत कमी परिणाम होईल. राजकीय नफा-तोट्याचा हिशेब मांडून त्यांनी हा निर्णय घेतला," असं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी सचिव आशिष दुआ यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनुसार, देवरा यांचा असंतोष हायकमांडला गेल्या काही महिन्यांपासून माहित होता. म्हणूनच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना अलीकडेच एआयसीसीचे संयुक्त कोषाध्यक्ष बनवलं होतं.
लवकरच जागावाटपाची घोषणा : राज्यात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवत आहे. सूत्रांनुसार, महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल जिथे 'इंडिया' आघाडीद्वारे जागावाटपाची घोषणा केली जाईल. जागा वाटपाची चर्चा अंतिम नसली तरी लवकरच एक फॉर्म्युला जाहीर केला जाईल. महाविकास आघाडीनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आधीच तयारी सुरू केली आहे. स्थानिक नेत्यांमध्ये चांगला समन्वय सुनिश्चित करण्यासाठी आणि मतांचं रूपांतरण सुनिश्चित करण्यासाठी लवकरच महाराष्ट्रातील सर्व 48 संसदीय जागांवर समन्वय पॅनेल तैनात केल्या जाईल.
पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढवणार : "राज्यात काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढवत आहेत. नेते एकमेकांच्या ओळखीचे आहेत, मात्र कार्यकर्तेही एकत्र काम करायला हवेत. या जागा- निहाय समन्वय पॅनेलमध्ये तिन्ही पक्षांचे नेते असतील आणि ते युतीच्या यशासाठी काम करतील," असं आशिष दुआ यांनी सांगितलं.
विभागनिहाय संघटना आढावा बैठका घेणार : दुआ यांच्या म्हणण्यानुसार, हे पॅनेल स्थानिक नेत्यांच्या संपर्कात राहून पाठिंबा मिळवतील. काँग्रेस युती सुरळीत चालेल याची खात्री देत आहे. तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देत आहे, असं त्यांनी सांगितलं. "प्रभारी नवीन सरचिटणीस यांनी 11 आणि 12 जानेवारी रोजी राज्यातील वरिष्ठ नेत्यांसह लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला. आता ते विभागनिहाय संघटना आढावा बैठका घेण्यासाठी राज्यभर फिरणार आहेत," असं दुआ म्हणाले.
काँग्रेसनं स्वतःला बळकट केलं पाहिजे : अंदाजानुसार, महाराष्ट्रात काँग्रेसकडे सुमारे 19 टक्के मतं आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही मित्रपक्षांमध्ये झालेल्या फुटीनंतर त्यांची राज्यातील मतं कमी झाली. "महाविकास आघाडीतील पक्षांना मदत करण्यासाठी काँग्रेसनं स्वतःला बळकट केलं पाहिजे. म्हणून, आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत आणि शक्य असेल तेथे सहयोगी पक्षांना सहकार्य करत आहोत," असं दुआ यांनी शेवटी सांगितलं.
हे वाचलंत का :