मुंबई - जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षांना सुरुवात झाल्यानंतर राज्यात आता पुढील महिन्यात एक ते 15 ऑक्टोबर या कालावधीत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी एमएचटी-सीईटी ही सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठीची माहिती आज (दि. 3 सप्टें) उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
कोरोना आणि त्याचे संकट राज्यात अद्यापही कायम आहे. मात्र, विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या संस्थाच्या परीक्षा सुरु झाल्याने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आपल्याकडील एमएचटी-सीईटी या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचे संकट लक्षात घेऊन मागील दोन महिन्यांपूर्वी या परीक्षा उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पुढे ढकलल्या होत्या. यासाठीचा निर्णयही राज्य सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आला होता. यामुळे आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध प्रकारच्या 13 व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली एमएचटी-सीईटी परीक्षा 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत. या परीक्षेला राज्यभरातील 6 लाख 92 हजार विद्यार्थ्यांपैकी 5 लाख 32 हजार 661 विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटीसाठी नोंदणी केली आहे.
यात सर्वाधिक अर्ज हे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक पुढील दोन दिवसात उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून जाहीर केले जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. मात्र. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या वेळापत्रकानुसार या परीक्षा ऑक्टोबर महिन्यातच पार पाडणे आवश्यक होते. पण, कोरोनाचे संकट लक्षात घेऊन राज्य सरकारने या परीक्षा पुढील महिन्यात घेण्याचे ठरवले आहे.
दरम्यान, हे वेळापत्रक जाहीर करताना उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून कोणकोणते नियम पाळले जाणार आहेत हे पहावे लागणार आहे.
हेही वाचा -इम्युनिटी क्लिनिकमुळे प्रतिकारकशक्ती चांगली होण्यास मदत - अमित देशमुख