मुंबई: म्हाडाने आता राज्यभरात सुमारे दहा हजार घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ही सोडत जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारी संस्था म्हणून महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ अर्थात म्हाडा ओळखली जाते. म्हाडाच्या वतीने राज्यातील विविध शहरांमध्ये सर्वसामान्यांना परवडणारी घरे दिली जातात. म्हाडाने नुकतीच ४०८२ घरांची सोडत मुंबई विभागात जाहीर केली होती या सोडतीचा निकालही नुकताच जाहीर झाला आहे.
कुठे असतील घरे? - म्हाडाच्यावतीने घरांची सोडत जाहीर करण्यात येणार असून कोकण म्हाडाच्या वतीने ठाणे, विरार, बोळीज, डोंबिवली या ठिकाणी सुमारे साडेचार हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. औरंगाबाद शहरातही घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असून यासाठी सुमारे 600 घरे या यादीत असणार आहेत. तर औरंगाबाद सोबतच आंबेजोगाई आणि लातूर येथील घरांचाही समावेश करण्यात येणार आहे.
२५ तारखेपासूनच अर्ज विक्री करण्यात येणार - पुणे शहरासाठीही याचवेळी सोडतीची घोषणा करण्यात येणार आहे. पुणे शहरात सुमारे पाच हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीची तयारी पूर्ण झाली असून ही सोडत २५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 25 तारखेपासूनच अर्ज विक्री करण्यात येणार आहे. त्याच सोबत अर्ज स्वीकारण्यातही येणार आहेत. पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. अशा एकूण १० हजार घरांसाठी राज्यभरात लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
४ हजार ८२ घरांसाठी सव्वालाख अर्ज- नुकतेच मुंबई मंडळाच्या ४ हजार ८२ घरांसाठी सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सिडको, म्हाडा यांच्या माध्यमातून घरे बांधण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. येणाऱ्या वर्षात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घरांची संख्या वाढणार आहे. धारावीसारखा महत्त्वकांक्षी प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा त्यात लक्ष घातले आहे. तब्बल ४ वर्षांनी म्हाडाच्या घरांची लॉटरी काढल्यानंतर ४ हजार ८२ घरांसाठी एकूण १ लाख २० हजार १४४ जणांनी अर्ज भरले होते.
हेही वाचा-