मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याच्या भायखळा येथील दगडी चाळीचा आता लवकरच पुनर्विकास होणार आहे. या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडे यासाठीचा प्रस्ताव सादर झाला आहे. हा प्रस्ताव मंडळाने स्वीकारला असून लवकरच पुनर्विकासासाठी मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी आज (दि. 19 मे) एका पत्रकार परिषदेत दिली आहे.
अशी आहे दगडी चाळ
अरुण गवळी याचं नाव घेतल्या बरोबर अनेकांच्या तोंडात एक शब्द आपोआप येतो तो म्हणजे दगडी चाळ. याच दगडी चाळीत अरुण गवळी आणि त्याचे कुटुंब राहते. येथे 10 इमारती असून यातील 8 इमारती अरुण गवळी आणि त्याच्या कुटुंबाच्या मालकीच्या आहेत. तर उर्वरित दोन इमारती ही गवळीने काही वर्षापूर्वी विकत घेतल्या आहेत. त्यामुळे आता येथील दहाही इमारती गवळी कुटुंबियांच्या नावावर आहेत. या इमारतीत गवळी कुटूंबासह इतरही कुटुंब राहतात. भायखळा रेल्वे स्थानकाबाहेर ना.म.जोशी मार्ग येथे दगडी चाळ असून विटांचे बांधकाम आहे. या इमारतींना आधी लाल विटांची इमारती, असे म्हटले जात होते.
2020 मध्ये गवळी कुटुंबाने केला दगडी चाळीच्या पुनर्विकासाचा विचार
दगडी चाळी जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे पुनर्विकासाचा निर्णय गवळी कुटुंबाने घेतला. त्यानुसार 2020 मध्ये त्यांनी यादृष्टीने हालचाली सुरू केल्या. दुरुस्ती मंडळाकडे तसा प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव नुकताच मंडळाने स्वीकारला आहे. त्यानंतर मंडळाने एलओआय प्रमाणपत्र दिले आहे. तर लवकरच पुनर्विकासासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले आहे. तेव्हा हा पुनर्विकास नेमका कसा असेल हे लवकरच समजेल.
हेही वाचा - लॉकडाऊनच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसांना बेड्या