मुंबई- कुलाबा-वांद्रे-सीपझ मेट्रो ३ प्रकल्पातील गिरगावमधील प्रकल्पबाधितांचे ४८ मजली टॉवरमध्ये रहायला जाण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. कारण गिरगावमधील प्रकल्पबाधितांच्या इमारतीच्या पुनर्विकासासाठीच्या पूर्व अर्हता निविदेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. जेएमसी प्रोजेक्ट (इंडिया), टाटा प्रोजेक्टस लिमिटेड, एल अँड टी आणि शापुरजी पालोनसह अनेक बड्या बांधकाम कंपन्या पुढे आल्या आहेत. आता या कंपन्यांकडून प्रत्यक्ष बांधकाम निविदा मागवत त्यातून एक निविदा अंतिम करत पुनर्विकासाचा ठेका देण्यात येणार आहे. तेव्हा यात कोणती कंपनी बाजी मारते हेच पाहणे आता महत्वाचे आहे.
मेट्रो ३ प्रकल्पात गिरगावमधील काही जुन्या-मोडकळीस आलेल्या इमारती बाधित झाल्या आहेत. तेव्हा या इमारतीचा एकत्रित पुनर्विकास करत रहिवाशांना मोठे आणि टॉवरमध्ये घर दिले जाणार आहे. यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएम
आरसी)ने विशेष आराखडा तयार केला होता. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी एमएमआरसीने पुनर्विकासासाठी पूर्व अर्हता निविदा मागवल्या होत्या. त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. जेएमसी प्रोजेक्ट (इंडिया), टाटा प्रोजेक्टस लिमिटेड, एल अँड टी लिमिटेड,वास्कॉन इंजिनिरिंग लिमिटेड, शपूरजी पलोनजी अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, मोंटोकारलो लिमिटेड, कॅपसाइट इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड, न्याती इंजिनिअर्स अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड, मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेड व नाथानी पारेख कन्स्ट्रक्शन लिमिटेड आदी कंपन्यानी अर्ज दाखल केला आहे.
आता या सर्व कंपन्यांकडून निविदा मागवत त्यातून एकाला हे कंत्राट देण्यात येणार आहे. दरम्यान या पुनर्विकास प्रकल्पाद्वारे ४७३ रहिवाशांचे तर ३७ व्यावसायिक आस्थापना आणि १९व्यावसायिक कार्यालयाचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. ४८ मजल्याचे टॉवर बांधत या सर्वांचे एकत्रित पुनर्वसन करण्यात येणार आहे. आराखडयानुसार ४८ मजली टॉवरमध्ये तीन तळ मजले सेवा तसेच पार्किंगसाठी राखीव असतील. ग्राउंड लेव्हल, एक ते सात मजले अंशतः व्यावसायिक गाळे, सेवा देण्यासाठी राखीव असतील.
आठ ते नऊ मजले व्यावसायिक गाळे, सेवा तसेच सुविधांसाठी राखीव असतील. १० ते १८ मजल्यांवर व्यावसायिक गाळे तसेच सदनिका असतील. १९ ते ४८ मजल्यांवर रहिवासी सदनिका असतील. या इमारतीस कार पार्किंगची सुविधा तसेच गार्डन आदी सुविधा राहतील. एकूण ४८ मजल्यांपैकी ३९ मजले रहिवासी सदनिकांसाठी राखीव असतील.
काळंबादेवी गिरगाव पुनर्वसन आराखड्या अंतर्गत ६ वेगवेगळ्या भूखंडांचे एकत्रितरित्या विकास केल्या जाणार आहेत. एकूण ६ भूखंडांपैकी के२, के३, जी३ हे भूखंड एकात्मिकरित्या विकसित केले जातील तर के१, जी १ आणि जी२ हे भूखंड मेट्रोसंबंधी कामांसाठी वापरण्यात येणार आहेत.
एमएमआरसीद्वारे के३ ही इमारत बांधण्यासाठी मे. वास्काँन या कंपनीची आधीच निवड झाली असून या इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.