मुंबई - येथील स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो 6 आणि कुलाबा-वांद्रे-सीपझ मेट्रो 3 प्रकल्प आता एकमेकांशी जोडले जाणार असून त्यांचे कारशेडही एकाच ठिकाणी कांजूर येथे असणार आहे. त्यामुळे आता मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. मात्र, त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयामुळे मेट्रो 3 चे काम लांबणीवर फेकले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. पण प्रत्यक्षात मात्र कांजूर कारशेडच्या कामाला सुरुवात झाली असून मेट्रो 6 चे कामही 20 टक्के पूर्ण झाले आहे. तर, आता या कामाला वेग देण्यात आला असून कारशेड आणि मेट्रो 6 चे काम पुढील अडीच वर्षात पूर्ण होईल अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली आहे. या अनुषंगाने मेट्रो 3 ला विलंब होणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
मेट्रो 3 च्या कारशेडचा वाद चिघळला होता. हा वाद अखेर मुख्यमंत्र्यांनी नुकताच सोडवला आहे. मेट्रो 3 चे कारशेड आरेतून हलवत ते कांजूरमध्ये नेण्यात आले आहे. जेव्हा कांजूरमध्येच मेट्रो 6 चे कारशेड बांधण्यात येत आहे. तेव्हा आता मेट्रो 6 आणि मेट्रो 3 चे कारशेड एकाच ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, दुसरीकडे मेट्रो 6 आणि मेट्रो 3 चे एकत्रितकरणही करण्यात आले आहे. त्यामुळे मेट्रो 3 साकीविहार मेट्रो स्थानकाला येऊन मिळणार असून पुढे कंजूरला जाणार आहे. एकूणच आता मेट्रो 3 चा विस्तार कांजूरपर्यंत झाला असून मेट्रो 6 च्या ट्रॅकवरून मेट्रो 3 पुढे जाणार आहे. या नव्या निर्णयानुसार आता या दोन्ही मार्गांची उभारणी करण्यात येणार आहे.
हे दोन्ही मार्ग जोडण्याच्या निर्णयानंतर मेट्रो 3 ची डिसेंबर 2021 ची डेडलाईन चुकणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) कडे याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही. राजीव यांनी मात्र मेट्रो 3 ला विलंब होणार नसल्याची ग्वाही दिली आहे. मुळात मेट्रो 6 चे काम आतापर्यंत 20 टक्के पूर्ण झाले आहे. तर, कारशेडच्या जमिनीवरही कामाला सुरुवात झाली आहे. महत्वाचे म्हणजे आता मेट्रो 6 च्या मार्गात कुठलाही बदल होणार नाही. केवळ साकीविहार मेट्रो स्थानकाच्या अलीकडे मेट्रो 3 चा भुयारी ट्रॅक मेट्रो 6 ला जोडून तो उन्नत मार्गावर आणावा लागणार आहे. तेव्हा मेट्रो 6 च्या कामाला-कारशेडच्या कामाला आम्ही वेग दिला आहे. त्यानुसार पुढील दोन ते अडीच वर्षात कारशेड आणि मेट्रो 6 तयार होईल, असे राजीव यांनी सांगितले आहे. मेट्रो 3 चे काम पूर्ण होईपर्यंत मेट्रो 6 चे कामही पूर्ण होईल. त्यामुळे मेट्रो 3 ला तसा काही मोठा विलंब होणार नसल्याचे स्पष्ट संकेत राजीव यांनी दिले आहेत.
दरम्यान मेट्रो 6 च्या मार्गात काही बदल करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी, पवईतील स्थानिकांकडून होत आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटल, पवई, आयआयटी, हिरानंदानी हॉस्पिटल असे परीसर मेट्रोने जोडत नागरिकांची आणखी सोय करावी असे म्हणत ही मागणी केली जात आहे. पण, राजीव यांनी मात्र आता मेट्रो 6 च्या मार्गात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एकूणच ही मागणी जोर धरण्याआधीच फेटाळून लावण्यात आली आहे.
हेही वाचा - 'प्रीमियम' कमी करण्यास म्हाडाचा स्पष्ट नकार