मुंबई : मुंबईतील पश्चिम उपनगरीय रेल्वे सेवेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावरून संध्याकाळी सहा वाजून 41 मिनिटांची भाईंदर लोकल गाडी सुटते. कार्यालय सुटल्यामुळे ही गाडी प्रवाशांनी खचाखच भरलेली असते. चर्चगेट रेल्वे स्थानकावरच गाडी भरत असताना मरीन लाईन्स रेल्वे स्थानकावर काही प्रवासी चढतात आणि पुढच्याच स्थानकापासून गाडीची उद्घोषणा सुरू होते. त्या पाठोपाठ किशोर कुमार यांच्या आवाजातील सुंदर आणि श्रवणीय चित्रपट गीतांचा सुर गाडीत उमटू लागतो. यामुळे गर्दीने त्रस्त झालेल्या प्रवाशांचे चेहरे फुलू लागतात. त्यांचे ओठही सोबत गुणगुण लागतात. दर बुधवारी, शनिवारी भाईंदर लोकलचा हा नेहमीचा ठरलेला डबा ही गाण्याची अनोखी मैफल होऊन जाते.
कोण आहेत विजय आशर? मरीन लाईन्स रेल्वे स्थानकावर विजय आशर आणि त्यांचे सहप्रवासी लोकलमध्ये चढतात. दर बुधवारी आणि शनिवारी विजय आपल्या सुमधुर आवाजात गाणी पेश करतात. विजय आशर हे मिरा रोड येथे राहतात. वयाच्या 72 व्या वर्षीही अत्यंत उत्साहाने ते एका शिपिंग कंपनीत काम करीत आहेत. तर गेली चाळीस वर्ष तो हा प्रवास करीत असल्याने या प्रवासादरम्यान सहप्रवाशांना गर्दीतला प्रवास सुसह्य व्हावा, तसेच त्यांचे काही काळ मनोरंजन व्हावे केवळ एवढाच त्यांचा गाणे म्हणण्याचा उद्देश आहे. त्यांना प्रवाशांकडून प्रतिसादा व्यतिरिक्त कशाचीही अपेक्षा नाही.
विस्मरणातील गाण्यांची आठवण : जुन्या हिंदी चित्रपटातील अनेक अजरामर गाणी अलीकडच्या पिढीला माहीत नाहीत. ती विस्मरणात चालली आहेत ही गाणी लोकांच्या काळजात घर करून राहावी. त्यांना पुन्हा पुन्हा उजाळा मिळावा यासाठी आपण ही जुनी गाणी गात असतो. चित्रपट संगीत टिकून राहावं आणि जुन्या गाण्यांची गोडी कायम राहावी हाच आपला यामागचा उद्देश आहे लोकांना आपला आवाज आवडू लागला आणि त्यामुळे आपल्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला असं विजय आशर सांगतात.
लोकांकडून स्पीकरची भेट : दर बुधवारी आणि शनिवारी भाईंदर लोकलमध्ये सजणारी ही मैत्री सहप्रवाशांना आवडू लागली त्यांनी स्वतःहून पैसे गोळा करून विजय आशर यांना एक स्पीकर आणि माईक भेट दिला त्यामुळे त्यांची महफिल आता माईकवर सुरू असते. त्यामुळे लोकल डब्यातील सर्व प्रवाशांना त्याचा आनंद लुटता येतो मुंबईचा लोकलमधील अतिशय गर्दीच्या वेळेत सुरू असलेली मैफिल प्रवाशांना प्रवास सुसह्य आणि सुखकारक करायला मदत करते त्यांना मिळणारा आनंदच आपल्यासाठी लाख मोलाचा असल्याचे आशर सांगतात.
आम्ही बुधवार- शनिवारची वाट पहातो : या लोकलमधून प्रवास करणारे सरप्रवासी विजय आशर यांच्यासाठी जागा राखून ठेवतात. खाण्याच्या वस्तू ते घेऊन येतात. त्यामुळे गाणी आणि सोबत खाद्यपदार्थ यामुळे मैफ चांगलीच रंगते. सव्वा तासांचा प्रवास कधी संपतो तेच कळत नाही. त्यामुळे आम्ही बुधवार आणि शनिवारी आवर्जून वाट पाहतो असे त्यांचे सहप्रवासी सांगतात.