अमरावती - दरवर्षी दिवाळीच्या आठ दिवसानंतर मेळघाटातील अनेक गावात घुंगरू बाजार भरतो. यावर्षीही ही मोठ्या उत्साहात या घुंगरू बाजाराला सुरुवात झाली आहे. दिवाळी नंतरचा येणाऱ्या पहिल्या आठवड्यात या बाजाराला सुरुवात होते. थाट्या आणि आदिवासी बांधवांकरिता मेळघाटातील हा घुंगरू बाजार प्रसिद्ध असतो. मेळघाटातील अनेक मोठ्या गावांमधे हा घुंगरू बाजार भरतो. या बाजारासाठी लगतच्या गावातील आदिवासी व थाट्या बांधव येत असतात. यावेळी आदिवासी हे ढोलकीच्या तालावर मनसोक्त नाचून दिवाळीचा फगवा वसूल करतात. तसेच या फगव्याचा उपयोग भोजन व सामाजिक धार्मिक कार्यक्रमासाठी करतात.
बाजारामध्ये थाट्या आणि आदिवासी बांधव नृत्य करत संपूर्ण बाजारातील जनतेचे लक्ष वेधून घेतात. आदिवासी बांधवांच्या घुंगरू बाजाराची चर्चा नागरिकांच्या कानावर असल्यामुळे आदिवासींचा घुंगरू बाजार बघण्याकरता अनेकजण बाजारात गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या कित्येक वर्षानुवर्ष आदिवासी बांधव ही परंपरा जोपासत आहे. यंदाही मेळघाटातील आठवडी बाजारात आदिवासी बांधवांचे जत्थे उतरले होते. या बाजारांमध्ये परिसरातील छोट्या छोट्या गावातील बांधव घुंगरू बाजारात एकत्र घेऊन या बाजारामध्ये एकमेकांच्या भेटी घेतात. यावर्षी कोरोना असला तरी आदिवासी बांधवांचा उत्साह कायम आहे. दरम्यान, पुढील आठवडाभर हा बाजार भरणार आहे.
हेही वाचा - मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना पुन्हा वाघाचे दर्शन
अग्नितांडवामुळे सर्वात मोठा घुंगरू बाजार रद्द -
मेळघाटातील सर्वात मोठा आणि पहिला घुंगरू बाजार हा धारणीमध्ये भरतो. धारणीत बाजार भरल्यानंतरच इतर गावात घुंगरू बाजार भरायला सुरुवात होते. मात्र, शुक्रवारी पहाटे चार वाजता लागलेल्या आगीमुळे घुंगरू बाजारातील अनेक दुकाने जळून खाक झाली. या अग्नितांडवामुळे तालुक्यातील सर्वात मोठा असलेला धारणातील घुंगरू बाजार यावर्षी प्रथमच रद्द झाला.
गोंड समाजाला ही महत्त्व -
मेळघाटातील आदिवासी बांधवांमधील गोंड या पशुपालक समाजाचा या घुंगरू बाजारात विशेष महत्त्व आहे. या समाजाला मेळघाटात ठाय्या असे म्हणत असल्याने बाजाराला ठाय्य बाजारसुद्धा म्हटले जाते.
'या' गावात भरतो घुंगरू बाजार -
गुरुवारी गावात पाडवा उत्सव साजरा केल्यानंतर घुंगरू बाजाराला सुरुवात होते. शुक्रवारी सर्वात मोठा बाजार हा धारणीला भरत असतो. त्यानंतर धारणी पाठोपाठ शनिवारी कळमखार, रविवारी चाकर्दा, सोमवारी बिजुधावडी आणि वैरागड, मंगळवारी टिटंबा, बुधवारी हरिसाल आणि सुसर्दा सह आदी गावात घुंगरू बाजाराची धूम राहणार आहे.
लक्ष वेधून घेणारा आकर्षक पोशाख -
या समाजातील पुरुष मंडळी विशेष पोषाखात घुंगरू बाजारात येतात. पांढरा सदरा, पांढरी धोती, काळा कोट, डोक्यावर काळा चष्मा, हाता काठी, बांसरी आणि डोक्यावर तुरेदार पगडी हा विशेष आकर्षण ठरतो. त्याचसोबत ढोल, टिमका, आणि बासुरीसह म्हशीचा सिंगाचा वाजणारी पुंगी हे बाजारातील लोकांचे लक्ष वेधून घेते.