मुंबई : रविवारी पावसाने काहीशी उसंत घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी मध्य ,हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर घेतलेल्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले. विशेष म्हणजे १७ जुलै २०२३ रोजी गटारी अमावास्या आहे. त्यामुळे रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबईकरांनी गटारी साजरी करण्याचा बेत आखला होता. त्यामुळे मांसाहार खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे मेगाब्लॉकमुळे लोकल गर्दीचा सामना करावा लागत आहे.
लोकल सेवा पुर्णपणे बंद : रविवारी मुख्य मार्गावरील माटुंगा ते ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यत दुरुस्तीचे काम करण्यात आले. यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरुन वळविण्यात आली होती. यामुळे विद्याविहार,कांजूरमार्ग स्थानकावर लोकल उपलब्ध नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे सीएसएमटी वडाळा स्थानकातून वांद्रे आणि गोरेगावला जाणारी लोकल सेवा पूर्णपणे बंद होती.
जलद मार्गावर जम्बोब्लॉक : त्याचबरोबर सीएसएमटी ते वाशी/ बेलापूर आणि पनवेलसाठी लोकल सेवा बंद होती. विशेष म्हणजे ब्लॉककालावधीत कुर्ला ते पनवेल विशेष लोकल सेवा सुरु होती. मात्र, या विशेष लोकल सेवा २० मिनिटांनी असल्याने कुर्ला रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी बघायला मिळाली. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते राममंदिर रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत अप आणि डाउन जलद मार्गावर जम्बोब्लॉक होता. या दरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरुन चालविण्यात आल्या होत्या.
ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी : तसेच काही लोकल रद्द केल्या होत्या. यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. विशेष तिन्ही मार्गावरील ब्लॉक संपल्यानंतर ही मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल फेर्यामध्ये गर्दी असल्याने रेल्वे प्रवाशांसाठी रविवारी प्रचंड हाल झाले. विशेष म्हणजे दादर, कुर्ला, आणि ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून आली आहे.
हेही वाचा - Gutari Amavasya : गटारीनिमित्ताने भाजपतर्फे मोफत कोंबडी वाटप; पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल