मुंबई - रेल्वेकडून दर रविवारी ट्रॅक, ओव्हरहेड वायर तसेच इतर उपकरणांच्या दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेतला जातो. या रविवारी २६ मार्च रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तीनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांनी आपला प्रवास करताना ,मेगाब्लॉकची दखल घेऊन प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक - रविवार २६ मार्च रोजी मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉक दरम्यान सकाळी ९.३० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या सर्व जलद मार्गावरील गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानाकात थांबतील. कल्याण येथून सुटणाऱ्या जलद गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या गाड्या दिवा, मुंब्रा, कळवा या स्थानकात थांबवल्या जाणार असून सर्व गाड्या १० मिनिटे उशीराने पोहचतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक - हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वर्षी यामध्ये सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान सीएसएमटी येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत पनवेल बेलापूर वाशी करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सर्व गाड्या बंद राहतील. या ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि वर्षी ते पनवेल या दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. या ब्लॉकमुळे प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता असल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे ठाणे ते वाशी नेरुळ या मार्गवरुन प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक - पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते जोगेश्वरी या दरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत पाचव्या लाइनवर जंबो ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे २५ मार्चला अहमदाबाद येथून सुटणारी अहमदाबाद बोरिवली एक्स्प्रेसचा प्रवास विरार येथे समाप्त केली जाणार आहे.