मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात उमेदवारी जाहीर करण्यासाठी आज (रविवारी) राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर सुरू झाली आहे. बैठकीमध्ये राज्यात दोन्ही पक्षांकडून तयार करण्यात आलेली यादी आणि त्यानंतर निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांपेक्षा मोठे आहेत का?
तर दुसरीकडे आघाडीमध्ये येत असलेल्या इतर घटक पक्षांना किती आणि कोणत्या जागा द्यायच्या यावर निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित असल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा - तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी शूर सैनिकांनी केला सर्जिकल स्ट्राईक - पंतप्रधान मोदी
या बैठकीनंतर आघाडीत सामील होत असलेल्या इतर घटक पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. तसेच आज (रविवारी) सायंकाळी मीरा भाईंदर येथे होत असलेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमात आम आदमी पार्टीचे माजी राज्य प्रमुख व वरिष्ठ नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत हे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. तेथे त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होईल. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये इतर नेतेही येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.