मुंबई - मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिका सारथी संस्थेचे प्रश्न आणि मराठा समाजातील प्रलंबित प्रश्नांबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सर्व समाज प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. मराठा समाजाच्या प्रतिनिधींशी सखोल चर्चा केल्यानंतर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे. तसेच आजच धोरणात्मक निर्णयांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांना फोन करून बैठकीसाठी बोलावून घेतले होते. मंत्रालयाच्या समिती सभागृहात आज झालेल्या बैठकीमध्ये याचिकाकर्ते विनोद पाटील, विरेंद्र पवार विनायक मेटे आणि मराठा समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व समाज प्रतिनिधींशी चर्चा करून मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न समजून घेतले.
खासदार संभाजीराजे सुरुवातीलाच प्रेक्षकांमध्ये बसले होते. परंतु समाजाचे प्रतिनिधींनी संभाजीराजे यांना व्यासपीठावर बसवावे, अशी मागणी केली. मात्र, याबाबत खुद्द खासदार संभाजीराजे यांनीच मी मराठा समाजाचा प्रतिनिधी असल्याने व्यासपीठावर बसणार नाही, अशी भूमिका घेतली.
बैठकीमध्ये प्रामुख्याने सारथी या संस्थेचे मध्ये सुरू असलेले मनमानी आणि मंत्री विजय वडेट्टीवार आणि सचिव गुप्ता यांच्या भूमिकेबद्दलही समाज प्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या स्टायपेंड संदर्भात देखील तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्व प्रश्न समजून घेतले आहेत. त्या संदर्भात तातडीने ते मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करताहेत, त्या दरम्यान या सर्व प्रलंबित प्रश्नाबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन आजच त्याची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.