मुंबई : मीरारोडमध्ये झालेल्या हत्याकांडामध्ये धक्कादायक माहिती समोर येत आहे. मीरारोड मधील गीता नगर आकाशदीप इमारतीतील ७०४ रुममध्ये तीन जूनला मध्यरात्री सरस्वतीची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. त्यानंतर अवशेष भाजले, शिजवले व कुत्र्याला खायला दिले. मात्र मध्यरात्री मृतदेहाचे मनोज सानेने मोबाईलमध्ये फोटो काढले, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
मनोज साने करतोय पोलिसांची दिशाभूल: प्राथमिक चौकशीमध्ये सरस्वती आणि मी अनाथ असल्यास मनोज साने यांनी पोलिसांना सांगितले होते. मात्र गुरुवारी सरस्वती हिच्या सख्या तीन बहिणींनी पोलिसांची भेट घेतली. त्यामुळे मनोज साने यांनी पोलिसांच्या बुधवारी चौकशीत सरस्वती अनाथ असल्याचा दावा फोल ठरला आहे.
२९ मेपासून मनोज कामाला गेला नाही, तेव्हापासूनच आखला हत्येचा कट: मनोज साने बोरिवलीमधील एका रेशनिग दुकानात काम करत होता. मात्र २९ मे पासून तो कामाला गेला नाही. तेव्हापासून त्याने सरस्वतीच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. हत्या करण्यापूर्वी मनोजने गुगल सर्च केले. गुगल सर्च करून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून काय करू शकतो हे त्याने पाहिले. त्यातूनच मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये उकळून तीन बादलीत ठेवले. ही कल्पना त्याला वेब सिरीज व श्रद्धा वालकर हत्याकांडमधून सुचल्याचे समोर आले आहे.
बातम्यामधून बहिणींना खुनाची मिळाली माहिती: पोलिसांनी सरस्वतीच्या बहिणी खरोखर बहिणी आहेत का, याची पोलिसांनी पडताळणी केली. यामध्ये सरस्वतीच्या एकूण पाच बहिणी असल्याचे समोर आले आहे. या पाच बहिणींमध्ये सरस्वती ही सर्वात लहान होती. मात्र पोलिसांच्या चौकशीत मनोज साने याने सरस्वती अनाथ असल्याचा दावा केला होता. त्यामुळे वारंवार पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे समोर येत आहे. शेवटी पोलिसांच्या चौकशीत मनोज याने माझे चुलते मुंबईत आहेत त्यांना कळवू नका, अशी विनंती देखील पोलिसांना दिली आहे. त्यामुळे मनोज दखील अनाथ नसून त्याचेही नातलग आहेत, हे स्पष्ट झाले.
मृतदेह ताब्यात द्या, सरस्वतीच्या बहिणीची पोलिसांना विनंती: गुरुवारी सरस्वतींच्या बहिणींनी पोलिसांची भेट घेतली आहे. पोलिसांकडून डीएनए तपासणी करण्यात येणार आहे. डीएनए यांची तुलना झाल्यानंतर सरस्वतीचा मृतदेह बहिणींच्या ताब्यात देणार आहे. सरस्वतीसह तिच्या चारही बहिणी या अनाथाश्रममध्येच होत्या. कालांतराने अनाथाश्रमातून बाहेर आल्यानंतर विविहित झाल्या. दहावीचे शिक्षण झाल्यानंतर सरस्वती अनाथ आश्रमामधून बाहेर आली. औरंगाबाद येथे आपल्या बहिणीकडे काही दिवस सरस्वती राहिली. सरस्वती अनाथ आश्रममध्ये असताना तिचे आई-वडील हे विभक्त झाले होते. काही दिवसातच सरस्वतीच्या आईचे निधन झाले. मात्र, अद्याप वडिलांचा अद्याप पत्ता नाही.
२०१३ -१४ मध्येच मनोजची झाली भेट: औरंगाबाद येथे बहिणीकडे राहिल्यानंतर सरस्वती नोकरीच्या शोधात मुंबईत आली. बोरवलीमध्ये नोकरीच्या शोधात असताना मनोज साने याने नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांची मैत्री झाली. काही दिवसात सरस्वती हिला नोकरी लागल्यानंतर राहण्यासाठी व्यवस्था नव्हती. त्यामुळे मनोज याने स्वतःचे 2 बीएचके घर आहे तू सोबत राहू शकते असे सांगितले. बोरिवलीमधील फ्लॅटमध्ये दोन वर्षे दोघेही एकत्र राहिले. २०१४ मध्ये मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी मंदिरात साध्या पद्धतीने लग्न केले.
एचआयव्ही बाधित असल्याचा मनोजचा दावा: मनोज साने पोलिसांच्या चौकशीत खोटे दावे करत असल्याचs आढळून आले आहे. त्यातच बुधवारी मनोजने एचआयव्ही बाधित असल्याचं पोलिसांना सांगितले. २००८ पासून औषध गोळ्या घेत आहे, असा दावा त्याने केला आहे. मात्र पोलिसांनी अद्यापही वैद्यकीय तपासणी न केल्याने मनोजचा दावा खरा आहे की खोटा आहे हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. एचआयव्ही बाधित असल्याने माझे आणि सरस्वतीचे शारीरिक संबंध देखील झाले नाही, असेही मनोजने पोलिसांना सांगितले आहे.
हेही वाचा-