मुंबई - कोरोनासारख्या महामारीच्या काळात इतर आजारावर उपचार होणे काहीसे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत गरीब-गरजू रुग्णांना न परवडणाऱ्या महागड्या औषधांची बँक तयार करून गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी भांडुपमधील तरुण पुढे सरसावले आहेत.
भांडुपमधील उत्साही मित्र मंडळाने हा उपक्रम सुरू केला आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेली परंतु, वापरात नसलेली औषधे गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही रुग्णालयांच्या मदतीने हा उपक्रम राबवला जात आहे. त्यासाठी भांडुपमधील डॉ. पांडे क्लिनिक (जमिल नगर), डॉ. सावंत क्लिनिक (जमिल नगर), डॉ. सोनक क्लिनिक (जमिल नगर), डॉ. अर्चना गोळे क्लिनिक (कोकण नगर), डॉ. गावंडे क्लिनिक (उत्कर्ष नगर), डॉ. जाधव क्लिनिक (कालीमाता मंदिर समोर) आणि डॉ. सुषमा परब क्लिनिकला (उत्कर्ष नगर) औषधे साठवून ठेवणारे डबे उत्साही मित्र मंडळाचे अमित भोगले यांच्यातर्फे देण्यात आले आहेत.
वापरात नसलेली व कालबाह्य न झालेली औषधे आपल्याजवळच्या क्लिनिकमधील मेडिसिन बँकमध्ये जमा करून त्याचा उपयोग गरीब- गरजू रुग्णांना होईल, असा या उपक्रमा मागचा हेतू आहे, असे मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा- अतिवृष्टीने नुकसान.. शरद पवारांसह मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांचा विविध ठिकाणी पाहणी दौरा