मुंबई: भायखळा पूर्वेकडील वेलकम गेस्ट हाऊसमध्ये २७ मार्चच्या रात्री ही घटना घडली होती. ३८ वर्षीय स्पॅनिश महिला पर्यटक या गेस्ट हाऊसमध्ये राहण्यासाठी आली. रात्रीच्या वेळी गेस्टहाऊसचा मॅनेजर रियाजने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत सुरुवातीला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्या रुममध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने वारंवार सेल्फी काढण्याचा बहाणा करून तिचा विनयभंग केला. अखेर पीडित महिलेने याबाबत पोलिसांत तक्रार दिली.
पोलिसांना स्पॅनिश कळत नव्हती पण..: तक्रारदार महिलेला स्पॅनिश व्यतिरिक्त इतर कोणतीही भाषा येत नसल्याने पोलिसांंनी गेस्ट हाउसमधील स्पॅनिश भाषा येणाऱ्या विदेशी नागरिकाची मदत घेतली. यानंतर गुगल ट्रान्सलेटरचा वापर करून महिलेशी संवाद साधला. विनयभंगाचे प्रकरण समोर येताच भायखळा पोलिसांनी आरोपी रियाजविरुद्ध २७ तारखेला गुन्हा दाखल केला. मूळच्या उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेल्या रियाजने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र भायखळा पोलिसांनी शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या.
पोलिसांची तत्परता आली कामी: विदेशी महिला पर्यटकासोबत ही घटना घडली असल्याने पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी तातडीने कठोर पावले उचलली. यांच्या मार्गदर्शनाखाली भायखळा पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक खोत, पोनि चिमाजी आढाव यांच्या नेतृत्वात तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक आसीफ पठाण यांनी अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा तपास पूर्ण केला. यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सोबतच न्यायालयाला विनंती करून त्याच दिवशी पीडित महिला पर्यटक आणि विदेशी साक्षीदार यांची न्यायालयासमोर साक्ष नोंदवून घेतली. पुढे, दोन महिन्यात साक्षीदार आणि भक्कम पुरावे सादर केले.
न्यायालयाने सुनावली 'ही' शिक्षा: माझगाव येथील २५व्या महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर चाललेल्या या खटल्यात न्यायालयाने २६ मे रोजी निकाल दिला. यात न्यायालयाने आरोपी रियाजला दोन वर्षे कैद आणि पाच हजार रुपयांचा दंड किंवा तीन महिने कैद अशी शिक्षा सुनावली आहे. पोलिसांच्यावतीने सरकारी अभियोक्ता एस. एस. कावळे यांनी युक्तिवाद केला. तर, कोर्ट पोलीस अंमलदार थोरात, निलेश घाडगे आणि प्रियंका थोरात यांनी न्यायालयीन कामकाज पार पाडले.
हेही वाचा: