मुंबई Mumbai Fire News : आज (27 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजेच्या सुमारास मुंबईतील आग्रीपाडा भागातील चिस्तिया पॅलेस या बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. ही आग इमारतीच्या तीन मजल्यांना लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसंच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, सध्या अग्निशमन विभाग या इमारतीचं परीक्षण करत आहे.
अग्निशमन दलाच्या बचावकार्यानं सर्व सुरक्षित : याबाबत अधिक माहिती अशी की, जहांगीर बोमन बेहराम मार्ग येथील आग्रीपाडा पोलीस स्टेशन जवळील नाथानी हाईट्स समोर असलेल्या चिस्तिया पॅलेस या बहुमजली इमारतीच्या 15, 16 आणि 17व्या मजल्यांना आग लागली. रहिवाशांनी लगेचच अग्निशमन दलाला पाचारण केलं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या जवानांसह घटनास्थळी दाखल झाल्या. कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र, या भागात धूर पसरला. या धुराचा अनेकांना त्रास झाल्यानं त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
शॉर्टसर्किटमुळं लागली आग : दरम्यान, या प्रकरणी अग्निशमन विभागाला विचारण्यात आलं असता, ते म्हणाले की, आगीचं मुख्य कारण हे शॉर्टसर्किट आहे. तळमजल्यापासून ते 21 व्या मजल्यापर्यंत काही जुनी वायरिंग आहे. तिथं बिघाड झाला आणि शॉर्टसर्किट झालं. त्यामुळं पंधरा, सोळा आणि सतराव्या मजल्यावर आग लागली. तसंच 5 व्या, 6 व्या, 7 व्या, 8 व्या आणि 15 व्या मजल्यावर स्थिर अग्निशमन यंत्रणेच्या प्रथमोपचार लाईनसह अग्निशमन कार्य सुरू आहे. 5 मोटर पंपांच्या 2 लहान होज लाइन कार्यरत आहेत. विविध मजल्यांवरील पायऱ्यांद्वारे जास्तीत जास्त व्यक्तींची सुरक्षितपणे सुटका केली जात असल्याचंही यावेळी अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आलंय.
हेही वाचा -