मुंबई - महाराष्ट्र राज्य पणन महामंडळात झालेल्या खत घोटाळ्यासाठी महामंडळाचे सरव्यवस्थापक एन. बी. यादव यांचे निलंबन करण्याची घोषणा पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची विधानपरिषदेत केली आहे. त्यासोबतच यादव यांना वाचवण्यासाठी या घोटाळ्यात सहभागी असलेल्या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जे.पी. गुप्ता यांचीही चौकशी केली जाईल आणि महामंडळाच्या कामकाजाचा आढावा लवकरच घेतला जाईल, असेही आश्वासन पणनमंत्र्यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिले.
शिवसेनेच्या डॉ. मनिषा कायंदे यांनी याविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. सातारा व उस्मानाबाद येथील 5 कोटी रूपयांचा खत घोटाळा झाला होता. त्यात यादव हे दोषी आढळले असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
हेही वाचा - कोरोनामुळे मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द
तर शेकापचे जयंत पाटील म्हणाले, हे महामंडळ आमची शान आहे, परंतु येथील भ्रष्टाचारामुळे ते अडचणीत सापडले असून सध्या यादव हेच महामंडळाचे आज एमडी आहेत. ते दोषी ठरलेले असताना त्यांचे केवळ निलंबन नको तर त्यांना बडतर्फ करा, अशी मागणी केली होती. त्यासोबत सभागृहातील इतर सदस्यांनीही ही मागणी लावून धरल्याने पणनमंत्र्यांनी यादव यांच्या निलंबनाची घोषणा केली. तसेच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जे. पी. गुप्ता यांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अनेक अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्यानंतर ते पुन्हा त्याच विभागात जाऊन कामावर रूजू होतात. त्यामुळे ते त्या पुन्हा जागेवर येणार नाहीत, यासाठी काही खबरदारी घ्यावी, अशी सूचना केली. त्यावर पणनमंत्र्यांनी निलंबीत केलेले अधिकारी पुन्हा त्याच जागेवर येणार नाही, त्यासाठी त्याची दक्षता घेतली जाईल, आणि यासाठी जीएडीला सूचना देण्यात येतील असे स्पष्ट केले.
हेही वाचा - सरकारचा फडणवीसांना धक्का, आता पोलिसांचे पगार ॲक्सिस ऐवजी राष्ट्रीयकृत बँकेत