मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शुक्रवारी (दि. 20 मार्च) राज्य सरकारने कार्यालये आणि दुकाने काही दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याला मुंबईतील धारावीत देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे. दररोज लाखो लोक धारावीत ये-जा करतात. मात्र, धारावीत आता दुकाने आणि छोटे उद्योग सर्वच धंदे बंद आहेत. त्यामुळे तुरळक प्रमाणात लोक रस्त्यावर आहेत.
मुंबईतील धारावी हे छोट्या-मोठ्या लघु उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. त्यामुळे येथील रस्त्यांवर फार मोठी गर्दी प्रत्येक दिवशी दिसत असते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने आणि महापालिकेने गर्दी न करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच दुकाने आणि व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर याठिकाणी शांतता पसरलेली आहे .रोज हजारो लोक या ठिकाणी नोकरी करून आपला रोजगार कमवत असतात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्या रोजगाराची परवा न करता देशावर आलेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी या ठिकाणी बंद पाळण्यात आलेला आहे. आपले मालक आपल्याला पगार देतील की नाही याची चिंता देखील काही कामगारांना आहे. मात्र, देशावर आलेल्या संकटाला आपण सामोरे जावे याचे गांभीर्य लक्षात घेत पोटाचा प्रश्न नंतर सरकारच सोडवेल, अशी आशा कामगार ठेवून बसले आहेत. धारावीतील लघुउद्योग बंद असल्याने कोट्यवधींचे नुकसान या ठिकाणी होणार आहे.
धारावीत कच्च्या तेलापासून ते सर्व खाण्या-पिण्याच्या आणि कपड्यांच्या वस्तू चामड्याच्या वस्तू निर्मिती केली जाते. या उद्योगांवर अवलंबून असलेल्या सर्वांनी बंद पाळला आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या धास्तीने मुंबईच्या लोकलमधील गर्दी ओसरली