मुंबई - महाराष्ट्राच्या राज्यपालांची बदली करुन तत्काळ निष्पक्ष राज्यपालांची नेमणूक व्हावी, अशी मागणी मराठी एकीकरण समितीकडून करण्यात आली आहे. यासाठी समितीकडून उच्च न्यायालयात निवेदन देण्यात येणार आहे.
राष्ट्रपती व राज्यपाल या पदावरील व्यक्ती निष्पक्ष असावेत. याकरीता दोन्ही सभागृहात दुरुस्ती विधेयक मंजूर करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. लोकशाहीचा व मतदारांच्या भावनांचा आदर करुन, घटनेच्या गाभ्याचा सन्मान करायचा असेल तर, या प्रकाराची सर्वोच्च न्यायालयाने आणि राष्ट्रपतींनी स्वत:हून याची दखल घ्यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्रात सत्तासंघर्ष कायम आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्तास्थापनेसंदर्भात बैठका सुरू असतानाच शनिवारी अचानक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. राज्यात निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यपाल्यांच्या भूमिकेवरून सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रपती आणि राज्यपाल या पदावर नियुक्ती केली जाणारी व्यक्ती ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावी, ही या पदासाठीची अट असते. मात्र, महाराष्ट्रातील राजकीय पेचात राज्यपाल कोश्यारी हे भाजपच्या पारड्यात जाणारे निर्णय घेत असल्याची टीका करण्यात येत आहे. तर, महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतके कार्यक्षम आणि दयावान राज्यपाल लाभले, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी कोश्यारींवर टीका केली होती.