मुंबई -राज्यातील केंद्रीय शाळा मंडळांपैकी सीबीएससी आणि आयसीएसई या मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय बंधनकारक व सक्तीचा राहील. याकरीता कायद्यात आवश्यक तो बदल करून कठोर कायदा करण्यात येईल, अशी महत्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानपरिषदेत केली.
मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्था व साहित्यिक हे माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि अरुणा ढेरे यांच्या नेतृत्वाखाली २४ जून रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. यासंदर्भात औचित्याचा मुद्दा शिवसेना सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडला.
दाक्षिणात्य राज्यांमध्ये तिथली प्रादेशिक भाषा सक्तीची असून या कायद्याच्या प्रती लक्ष्मीकांत देशमुख, अरुणा ढेरे यांनी मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्र्यांना पाठवल्या आहेत. आंदोलनकर्त्या साहित्यिकांना मुख्यमंत्री भेट देणार का? अशी विचारणा डॉ. गोऱ्हे यांनी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय बंधनकारक आहे.
सीबीएससी आणि आयसीएसई मंडळाच्या शाळा जर याचे पालन करीत नसतील तर त्यासाठी सदर कायद्यात बदल करून त्या विरोधात कठोर केला जाईल. मराठी शाळा आणि मराठी भाषेच्या विेषयासाठी समोर आलेल्या साहित्यिकांच्या शिष्टमंडळाला सोमवारी भेट देवून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.