मुंबई Maratha Reservation Protest : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. तब्येत खालावली असतानाही जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत. राज्यभरात आरक्षणावरून मराठा आंदोलक आक्रमक होत असताना मराठा आरक्षण उपसमितीची १० वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मराठा आरक्षणासाठी नेमलेली शिंदे समितीचे सदस्यही बैठकीला उपस्थितीत राहण्याची शक्यता आहे. तर दुपारी १ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. राज्य सरकारनं भूमिका जाहीर केल्यानंतर जरांगे पाटील माध्यमांशी बोलणार आहेत.
Live Updates :
- मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेत बऱ्याच मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. आमच्या वाट्याला गेला तर लक्षात ठेवा. प्रकाश सोळंके यांनी आमच्याबद्दल काही विधानं केली असतील. त्यामुळंच त्यांच्या घरावर हल्ला झाल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
- मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलन आक्रमक झाले असून, गंगापूर खुलताबाद मतदार संघाचे भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांचे गंगापूर शहरातील संपर्क कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडले आहे.
- मराठा आरक्षण आंदोलन मराठवाड्यात चिघळताना दिसून येतंय. सोमवारी सकाळी मराठा आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांची गाडी व बंगला पेटवला होता. तर आता माजलगाव नगरपरिषदेची इमारत मराठा आंदोलकांनी पेटवून दिली आहे. हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक माजलगाव नगरपरिषदेबाहेर जमा झाले होते.
- मराठा आंदोलकांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपरिषदेची इमारत पेटवल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं आता बीड जिल्ह्यात मराठा आंदोलन चिघळलं आहे.
- ग्रामस्थांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले. ग्रामस्थांनी आग्रह केल्यानंतर जरांगे पाटील यांनी पाणी पिण्याची तयारी दर्शविली. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली. राज्य सरकारचा प्रस्ताव जरांगे फेटाळला.
- कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गावा-गावात साखळी उपोषण सुरू आहे.
- मराठा आरक्षणाकरिता शिर्डीमध्ये ग्रामस्थांनी बंदची हाक दिली आहे.
- सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये मराठा आंदोलकांनी विराट मोर्चा काढला. आंदोलक तहसीलदारांना निवेदन देणार आहेत.
- उमरखेडचे आमदार नामदार ससाणे यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावे लागले. मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर त्यांना माघारी फिरावं लागले.
- मराठा आंदोलकांनी आक्रमकपणं आंदोलन सुरू केल्यानं जालना, नांदेड, बीडसह इतर जिल्ह्यातील एसटी वाहतूक सेवेला फटका बसला आहे.
- सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून रास्तारोको करण्यात आला.
- वैद्यकीय उपचार घेण्यास जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे. प्रकृती खालावल्यानं त्यांना उठून बसणेही शक्य होत नाही.
- माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. प्रकाश सोळंकेंच्या गाड्याही पेटविण्यात आल्या आहेत.
- परभणीतही तहसीलदाराचे वाहनही फोडण्यात आले.
शिंदे समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी पत्र देण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली. सरकारने माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिंदे समिती गठीत केली आहे. ही समिती मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अहवाल राज्य सरकारला देणार आहे. तेलंगाणा येथे निवडणूक असल्यामुळे सरकारी निजामकालीन नोंदी व कागदपत्रे मिळण्यास विलंब होत असल्याचं शिंदे समितीचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीत शिंदे समितीला राज्य सरकारनं 24 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
काय होती शिंदे समितीची मागणी? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणाच्या संदर्भात शिंदे समितीला तेलंगणा राज्यात जाऊन जुने दस्तऐवज मिळवून त्यांची छाननी करण्यासाठी वेळ लागू शकतो. तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुका आहेत. डिसेंबर महिन्यात कागदपत्र उपलब्ध करून देऊ, असे तेथील शासकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे डिसेंबर अखेर शिंदे समितीचा अहवाल तयार होऊ शकतो. त्या अनुषंगाने दोन महिन्याची मुदत वाढ मिळावी, अशी विनंती शिंदे समितीनं सरकारला केली होती.
- मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. कुणबी प्रमाणपत्राबाबत अहवाल लवकर तयार करून मराठा समाजाला कशाप्रकारे न्याय देता येईल, यासाठी महायुती सरकारला कसरत करावी लागणार आहे. अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारीदेखील ठेवावी लागणार आहे.
हेही वाचा-