मुंबई MLA Prakash Solanke : माझ्या घरावर हल्ला करण्याचं पूर्व नियोजित होतं. घराबाहेरच्या जमावात इतर समाजाचे लोकंही होते. जमावात राजकीय विरोधक असल्याची माहिती आता मला मिळाली आहे. आंदोलकांपैकी 200 ते 250 लोक हे समाजकंटक होते, असा खुलासा आमदार प्रकाश सोळंके यांनी केलाय. मात्र, या सर्व प्रकारात मला संरक्षण देणारे मराठा समाजाचे लोक होते, अशी माहितीही सोळंके यांनी दिली.
हल्ला करणारे समाजकंटकच : माझे राजकीय विरोधातील कार्यकर्ते हे या हिंसाचारात सहभागी होते. या सर्व घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिलंय. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भात मी दोनवेळा चर्चा केलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितलंय. दरम्यान, सोमवारी मराठा आंदोलनावेळी काही समाजकंटकांनी आमदार प्रकाश सोळंके यांचं घर आणि गाडी जाळली होती. यात त्यांच्या मालमत्तेचं मोठं नुकसान झालं होतं.
बीडमध्ये समाजकंटकांचा राडा : बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटलाय. माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke House Fire) यांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली होती. याशिवाय सोळंकेंच्या घराबाहेर (Maratha Protest Beed) असलेल्या गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली होती. याप्रकरणी आता गुन्हे दाखल करुन काहींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे.
आमदार संदीप क्षीरसागर यांचं घरही जाळलं : मराठा आंदोलनादरम्यान बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं घरही जाळण्यात आलं होतं. दरम्यान, घरावर केलेला हल्ला हा मराठा समाजानं नाही तर काही समाजकंटकांकडून करण्यात आल्याची प्रतिक्रिया आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली होती. या सर्व घटनेनंतर बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करुन इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती.
हेही वाचा -