मुंबई Maratha Reservation : राज्यभरात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात कोणीही कायदा हातात घेऊ नये, अन्यथा कारवाई करणार असल्याचं राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी म्हटलं आहे. राज्यभरात झालेल्या हिंसक आंदोलना प्रकरणी आतापर्यंत 168 जणांना अटक करण्यात आली आहे.
तीन जिल्ह्यात इंटरनेट बंद : आंदोलनादरम्यान राज्यात ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. तसंच जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. बीडमध्ये एसआरपीएफच्या 17 तुकड्या, तसंच एक जलद कृती दलाची तुकडी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली आहे.
आमदारांच्या खुनाचा प्रयत्न : राज्यात काही ठिकाणी शांततेत मराठा आंदोलन सुरू असल्याची माहिती देखील रजनीश शेठ यांनी दिली आहे. आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. महाराष्ट्रात बारा कोटींच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे. बीडमधील हिंसाचारप्रकरणी वीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी सात गुन्हे आमदारांच्या खुनाच्या प्रयत्नाचे असल्याचं रजनीश सेठ यांनी सांगितलं.
संभाजीनगरमध्ये 106 जणांना अटक : यापैकी संभाजीनगरमध्ये 54 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 106 जणांना अटक करण्यात आली आहे. बीडमध्ये 20 गुन्हे दाखल झाले असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच संभाजीनगर ग्रामीण, जालना बीडमध्ये 48 तास इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. रजनीश सेठ यांनी नागरिकांना शांततेत कायदा, सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलंय.
राज्यात 141 गुन्हे दाखल : महाराष्ट्रात आतापर्यंत 141 गुन्हे दाखल झाले असून 168 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 146 आरोपींना CRPC 41A अंतर्गत नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या आंदोलनामुळं राज्यात 12 कोटी रुपयांच्या सरकारी मालमत्तेचं नुकसान झाले आहे. कायदा मोडणाऱ्या आंदोलकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिले आहेत.
हेही वाचा -