मुंबई - राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात अडकून पडलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांची मुंबईत अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील यांच्यासमवेत बैठक झाली. येत्या १७ मार्चला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, अॅड. शिंदे, मराठा आरक्षण कामकाज उपसमितीचे सचिव शिवाजी जोंधळे, उपसचिव गुरव हे देखील या बैठकीला उपस्थित होते. मागील अनेक दिवसांपासून मराठा आरक्षण न्यायालयात अडकले आहे. कोणत्याही स्थितीत राज्यात मराठा आरक्षण लागू झाले पाहिजे ही राज्यातील मराठा समाजाची इच्छा आहे. त्यामुळे मराठा आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची भूमिका अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच घेतली होती.