मुंबई - उच्य न्यायालयाच्या निर्णयानुसार मराठा आरक्षण लागू केल्याने आधीच्या 16 टक्क्यांच्या आरक्षणावर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आजपासून आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने ग्राह्य धरले असले तरी आरक्षणाची टक्केवारी बदलल्याने मराठा विद्यार्थ्यांवर टांगती तलवार आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला न्यायालयाच्या निर्णयाआधी 16 टक्के आरक्षण दिले होते. मात्र, न्यायालयाने केवळ 13 टक्केच शैक्षणिक आरक्षण देण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे ज्या विद्यार्थ्यांनी 16 च्या टक्केवारीत प्रवेश मिळवला आहे. त्या हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेटही घेतली.
सरकारने त्वरित 16 टक्केत प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवावा, अन्यथा त्यांच्यावर अन्याय होईल, असे पाटील यावेळी म्हणाले. मराठा आरक्षणाच्या 2 वेगवेगळ्या अध्यादेशामुळे मराठा तरुणांचे भविष्य संकटात आले आहे. नोकरीमध्ये 16 टक्के आरक्षण देत मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, आता न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे 13 टक्के आरक्षण देण्याचा नवा अध्यादेश काढण्यात आला आहे. तर आधी शिक्षणात 16 टक्के आरक्षण देत प्रवेश याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या.
मराठा समाजाच्या आरक्षणात दोनदा अध्यादेश जारी करण्यात आले. त्यामुळे 33 हजार तरुणांच्या डोक्यावर टांगती तलवार उभी राहिली असल्याने आंदोलन करावे लागत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. सरकारने लवकरात लवकर 16 टक्के आणि 13 टक्क्यांच्या निर्माण झालेला पेच सोडवावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. विद्यार्थ्यांच्या मागणी बाबतचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले आहे. जो पर्यंत 16 टक्यात प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.