मुंबई - मराठा आरक्षणासाठी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात आरक्षणाच्या मागणी संदर्भात आजपासून ठिकठिकाणी निदर्शनांना सुरुवात झाली आहे. मुंबईतील आंदोलनावेळी संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते.
आश्वासनाप्रमाणे मराठा आरक्षणाची पूर्तता करावी -
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यानंतर सरकारने कुठलीच पावले उचलली नाहीत. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी, तरुणांना शिक्षण आणि नोकरीतील संधींपासून वंचित राहावे लागत आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारने १२ हजार पदांसाठी पोलीस भरती जाहीर केली. आता ऊर्जा खात्यात 9 हजार पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. आरक्षणाअभावी या भरती प्रक्रियेत मराठा समाजाला स्थान मिळणार नसल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाबाबत शासनाने दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करावा, अशी मागणी मराठा आंदोलकांची आहे.
नोकरभरती करू नये -
सध्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायलायने स्थिगिती दिली आहे. जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने कुठल्याही प्रकारची नोकरभरती करू नये, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल -
आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर २७ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. सरकारने याबाबत काय तयारी केली, याची माहिती मराठा समाजाला देण्यात आलेली नाही, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे वrरेंद्र पवार यांनी दिली.