मुंबई - दुष्काळात होरपळलेला शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे. परंतु, त्यांना चिंतेत टाकणारी बातमी हवामान खात्याकडून आली आहे. यंदा एक आठवडा उशिराने केरळात मान्सूनचे आगमन होणार आहे. म्हणजे ६ जूननंतर मान्सून केरळात दाखल होईल, तर राज्यात साधारणत: १२ जूनला मान्सून कोकणच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याबाबतची माहिती हवामान विभागातील अधिकारी अरविंद श्रीवास्तव यांनी दिली.
केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर हवेच्या दाबावर राज्यातील मान्सूनचे आगमन अवलंबून राहणार आहे. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर साधारण ६ दिवसांनी म्हणजे १२ जूनला मान्सून कोकण किनारपट्टीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनचे आगमन पुन्हा एक आठवडा लांबणीवर गेले आहे. त्यामुळे शेतकरी आणखीनच चिंतेत पडला आहे.
पुढील तीन दिवस उष्णतेची लाट कायम
सध्या राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आहे. पुढील ३ दिवस ही लाट कायम राहील, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट आहे. ही लाट विदर्भात पाच दिवस तर मराठवाड्यात आणखी तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.