मुंबई - मनोज कोटक हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. ते नक्की खासदार होतील. त्यांच्या प्रचाराला मी जाईन, पण मला प्रचाराला जायची गरज पडणार नाही, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांसंदर्भात बोलणे टाळले.
ईशान्य मुंबईतील भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, खासदार अनिल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. या भेटीदरम्यान कोटक यांनी उद्धव ठाकरेंनी निवडणुकीत मदत करावी, अशी मागणी केली. उद्धव ठाकरे यांनी कोटक यांना शुभेच्छा दिल्या.
ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांनी मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. यामुळे शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी होती. किरीट सोमय्या यांना उमेदवारी द्यावी यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात होते. मात्र शिवसेनेकडून सोमय्या यांना विरोध होता. त्यामुळे या मतदारसंघातून कोटक यांना उमेदवारी देण्यात आली होती.