मुंबई - महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना मिळणाऱ्या सुविधा पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कंत्राटी कामगारांना मिळत नसल्याचा आरोप मनसेचे कामगार सेना चिटणीस केतन नाईक यांनी केला आहे. कंत्राटी सफाई कामगारांना आवश्यक सुविधा न मिळाल्यास 'काम बंद'चा इशारा मनसेच्या कामगार सेनेने दिला आहे.
कोरोनासारख्या संकटाशी लढत असताना पालिकेच्या कामगारांना एक न्याय आणि कंत्राटी कामगारांना वेगळा, असे दुट्टपी धोरण महापालिका प्रशासन राबवत आहे. 23 मार्चला पालिकेने परिपत्रक काढून नोकरीत कायम असणाऱ्या कामगारांना संचारबंदीच्या काळात प्रवास करण्यासाठी 300 रुपये प्रवास भत्ता सुरू केला. परंतु, कंत्राटी वाहन चालक व वाहन स्वच्छता करणाऱ्या कामगारांना या परिपत्रकातून वगळण्यात आल्याने मनसेची कामगार सेना आक्रमक झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने कायम व कंत्राटी कामगारांना सामान दिलासा देत प्रत्येकी 300 रुपये प्रवास भत्ता लागू केला आहे.
कायम कामगारांना मागणीनुसार नवीन मास्क, हातमोजे आणि साबण पुरवण्यात येत आहेत. मात्र, कंत्राटी कामगारांना एकदाच दिलेले मास्क व हातमोजे धुवून वापरण्यास सांगण्यात येत आहे. कायम कामगारांना कामावर असताना गरम पाण्यात मिसळून घ्यावयाचे पेय देण्यात येत आहे. तसेच एकवेळचे जेवण देखील दिले जात आहे. कंत्राटी कामगारांना या प्रकारच्या सोयीसुविधा मिळत नसल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिलाय.
रिलायन्स फाउंडेशनतर्फे कोरोनाची लढाई लढणाऱ्या कामगारांसाठी 1500 रुपयांचे व्हाउचर देण्यात आले आहे. संबंधित व्हाउचर महापालिकेतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी, आरोग्य स्वयंसेविका, खाडाबदली कामगार, कंत्राटी रुग्णवाहिका, वाहन चालकांना देण्यात आले. यासंबंधी प्रसारित केलेल्या परिपत्रकात कंत्राटी वाहन चालकांना देखील व्हाउचर देण्याचा उल्लेख आहे. मात्र, अद्याप याची अंमलबजावणी झाली नाही. महापालिका प्रशासनाची ही वागणूक बेजबाबदारपणाची असून या संकटसमयी शोभनीय नसल्याचे वक्तव्य महाराष्ट्र कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी केली आहे.