मुंबई - मुस्लीम धर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हज यात्रेसाठी भारतातूनही भाविक जातात. या यात्रेला मुंबईतील आफाक अन्वर लारी नावाचे ५७ वर्षीय गृहस्थही जाणार आहेत. त्यांची हज यात्रा इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे. कारण ते हा प्रवास सायकलवरून पूर्ण करणार आहेत. त्यामुळे त्यांची हज यात्रा चर्चेचा विषय ठरली आहे.
आफाक अन्वर लारी हे शिवाजी नगर गोवंडी येथील रहिवासी आहेत. २००२ मध्ये एका नागरिकाने मुंबई ते हज असा सायकल प्रवास केला होता. तेव्हापासून आफाक यांनी सायकलने जाण्याचा चंग बांधला होता. त्यांची ही इच्छा या वर्षी पूर्ण होत आहे. बुधवारी सकाळी मुंबईच्या गोवंडी येथून ते प्रयाण करतील.
लारी यांचा पूर्ण प्रवास ७ हजार किलोमीटरचा असणार आहे. मुंबईहून दिल्लीला गेल्यावर काही कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर वाघा सीमामार्गे पाकिस्तान, इराण, इराक, जॉर्डन, सौदी अरब ते हज असा त्यांचा प्रवास असणार आहे. आफाक यांच्या यात्रेला महादेव आंबेकर, अन्वर खान, खान अब्दुल कलीमसह त्यांच्या मित्रांनी शुभेच्छा दिल्या आहेत.