मुंबई - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने डोक्यात गॅस सिलिंडर मारून पत्नीची हत्या केली. घाटकोपर पश्चिम परिसरातील भटवाडी येथे ही घटना घडली. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आरोपी पती प्रदीप कदम याला अटक केली आहे.
आरोपी प्रदीप कदम हा आपल्या पत्नी सोबत भटवाडी येथे वास्तव्याला होता. मागील काही दिवसांपासून प्रदीप पत्नीच्या चारित्र्यवर संशय घेत होता. बेरोजगार आणि दारुच्या आहारी गेलेल्या प्रदीपचे त्याच्या पत्नीशी वारंवार भांडणे होत होती. 13 फेब्रुवारीला सकाळी सर्व कुटुंब झोपेत असताना प्रदीपने घरातील गॅस सिलिंडर झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात घातले.
हेही वाचा - चारित्र्याच्या संशयातून रॉकेल टाकून पत्नीला पेटवले; पती अटकेत
यात हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी तिला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्यानंतर आरोपी प्रदीप स्वतः घाटकोपर पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजवाडी रुग्णालयात पाठवला.