मुंबई : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून दिल्लीमध्ये सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दिल्ली असो की महाराष्ट्र दोन्ही सभागृहांमध्ये मणिपूर येथील हिंसाचारावरून सदस्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या आमदारांनी भावी मुख्यमंत्री अशा शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात नाराजी असल्याच्या चर्चा आहेत. या दोन्ही मुद्यांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मन की बात नही, मणिपूर की बात करो, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.
मन की बात नही मणिपूर की बात करो : मणिपूरची स्थिती दिवसेंदिवस भयंकर होत चालली आहे. चीनला तुम्ही घाबरत आहात का? एका पीडित महिलेचा पती कारगिल युद्धात देशासाठी लढला आहे. देशाचे संरक्षण करत असताना आपल्या पत्नीची आब्रु तो वाचवू शकला नाही. संपूर्ण देशासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. केंद्र सरकार मणिपूरची हिंसा, महिलांवरील अत्याचार फक्त पाहात बसले आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली. अशा परिस्थितीत खरे तर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा, पण तो घेत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात करतात. मात्र मन की बात नही मणिपूर की बात करो, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी यावेळी केला. सर्वोच्च न्यायालयाने फटकारले तेव्हा तुम्ही यावर बोलले आहात. आम्ही जेव्हा या विषयावर संसदेत प्रश्न विचारतो तेव्हा संसदेत याप्रकरणी बोलू दिले जात नसल्याचेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
मणिपूरची स्थिती काश्मीरपेक्षा भयंकर : आम्ही मागच्या तीन महिन्यांपासून यावर बोलत आहोत. आता मणिपूरची स्थिती काश्मीरपेक्षा भयंकर झाली आहे. भाजपला हिंदू मुसलमान तिथे करता येते, काश्मीरमध्ये ते काश्मीर फाईल्स रंगवत असतात. पण, आता मणिपूरच्या फाईल्स लोकांसमोर येत असल्याची टीका संजय राऊत यांनी आज मुंबईतील निवास्थानी माध्यमांशी बोलताना सरकारवर केली. मणिपूरमध्ये या हिंसाचारात घडलेली ही काही पहिलीच घटना नाही. अशा शेकडो घटना तिथे घडल्या आहेत. तिथल्या जवानांवर जमाव हल्ले करत आहे आणि सरकार फक्त मूकदर्शक बनून सर्व पाहात आहे. मणिपूरमध्ये भाजपला कोणताही राजकीय फायदा दिसत नाही. त्यामुळेच सर्व भाजपवाले शांत आहेत. तेच मणिपूरमध्ये एक जरी अल्पसंख्यांक व्यक्ती असता तर आतापर्यंत संपूर्ण देशात यांनी रान उठवले असते, असेही खासदार संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम : दुसरीकडे राज्यात आज उपुख्यमंत्री अजित पवार व उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. तर, अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील सोशल मीडियावर भावी मुख्यमंत्री लवकरच अशा आशयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात नाराजी असल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "मी आधीच सांगितले होते. अजित पवार मुख्यमंत्री बनणार आहेत. आज पुन्हा सांगतो अजित पवार लवकरच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करतील. ही जी दोस्ती आहे ते दोघे मिळून शिंदे गटाचा कार्यक्रम करतील. हे सगळे ठरल्याप्रमाणे स्क्रिप्टेड होईल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
हेही वाचा -