मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. मात्र, वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या आणि वैद्यकीय कारणांमुळे प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून ई-पास दिले जात आहेत. पाच हजार रुपयांना एक बनावट ई-पास देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मनोज हुंबे (रा.चेंबूर) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
या आरोपीने आत्तापर्यंत ई-पासच्या बारकोडमध्ये फेरफार १४७ बनावट ई -पास प्रत्येकी पाच हजार रुपयांना विकल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊन काळात मुंबईत बनावट ई-पास बनवणाऱ्या, अशा अनेक टोळ्या सक्रीय असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून चेंबूर येथे सापळा रचून या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीचा आणखी एक साथीदार सध्या फरार आहे.
अटक आरोपी मनोज हुंबेने केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतले असून एका आठवड्यापूर्वी त्याने बनावट पास बनवून त्याचे वाटप करण्यास सुरुवात केली होती. त्याने आत्तापर्यंत पालघर, ठाणे, रायगड, पुणे या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी बनावट ई-पास बनवले आहेत. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.