मुंबई- राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आठवडा उलटला, तरी अद्याप सरकार स्थापन करण्यास भाजप-शिवसेनेला अपयश आले आहे. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही महायुतीतील मित्रपक्ष मुख्यमंत्रीपदासाठी भांडत असताना बीडमधील एका तरुणाने मला मुख्यमंत्री करा, अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता भीम आर्मी संघटनेचे अशोक कांबळे यांनीही आपल्याला मुख्यमंत्री करावे, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे.
नुकतेच राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने सरकार कोणी स्थापन करावे यावरून काथ्याकूट केला जात आहे. भाजप आणि शिवसेनेची युती आहे. त्यांच्याकडे बहुमतासाठी लागणारा आकडा असला तरी मुख्यमंत्री कोण या मुद्यावर दोघाही पक्षांमध्ये वाद असल्याने सरकार स्थापन करण्यात आलेले नाही. एकीकडे सरकार स्थापन होत नसताना दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी असलेला दुष्काळ यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देता यावा म्हणून जोपर्यंत भाजप आणि शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटत नाही तो पर्यंत मला मुख्यमंत्री करावे, अशी मागणी बीड येथील श्रीकांत विष्णू गदळे यांनी राज्यपालांकडे केली आहे.
तर, आज महाराष्ट्रात "परतीच्या पावसाने " शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले आहेत. मंदीमुळे नोकऱ्या गेल्या आहेत. वाढत्या महागाईमुळे गृहिणी त्रस्त आहेत. शैक्षणिक धोरणाचा बोजवारा उडाला आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. असे असताना महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना यांच्या अंतर्गत भांडणांमुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे अद्याप ठरलेले नाही. या दोन पक्षांच्या भांडणात महाराष्ट्राला वेठीस धरले जात आहे. दोन्ही पक्षांचा मुख्यमंत्री ठरत नाही तो पर्यंत मला मुख्यमंत्री करा, अशी मागणी भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अशोक कांबळे यांनी राज्यपालांकडे केली आहे.
हेही वाचा- 'राष्ट्रपती राजवटीची धमकी म्हणजे महाराष्ट्राचा अपमान'