मुंबई - मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनी आता घरकामासाठी घराघरात येणाऱ्या मोलकरणीसाठी नवीन नियम बनवण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार मुंबईतील काही सोसायट्यांनी मोलकरणीची कोरोना चाचणी बंधनकारक आहे. ती निगेटिव्ह असेल तरच तिला प्रवेश दिला जाईल, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता मोलकरणीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला असून, घरकामगार संघटनानी मात्र याला जोरदार विरोध केला आहे. आम्ही चाचणी करु पण मग सोसायटीतील, घरातील प्रत्येकाची चाचणी करावी, अशी मागणी मोलकरणींनी केली आहे. तर ही जाचक अट असून, असे करत सोसायट्या उपनिबंधकाच्या आदेशाचा भंग करत असल्याचा आरोप सहकारी क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे.
मुंबईत मोलकरणींची संख्या खूप मोठी आहे. पण गेल्या 3 महिन्यांपासून अनेक मोलकरणी घरी बसून आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे मोलकरणींना लॉकडाऊनमध्ये सुट्टी देण्यात आली आहे. पण आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने मोलकरणीही कामाला जाऊ शकणार आहेत. पण या मोलकरीणीसमोरील अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील काही संघटनानी कोरोना चाचणी निगेटिव्ह असेल तरच मोलकरणीला सोसायटीत प्रवेश मिळेल, असे फर्मान काढले आहे. तर काही सोसायट्यांनी 24 तास स्वरूपात मोलकरीण ठेवावी, अशी अट घातली आहे. जाऊन-येऊन काम करणाऱ्या मोलकरणीला परवानगी नाकारली आहे. तर काही सोसायट्यांनी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आलेलीच मोलकरीण हवी. ती आल्यानंतर 14 दिवस त्या घराने होम क्वारंटाइन व्हावे, असेही पत्रक काढले आहे.
आज मुंबईसह राज्यभर हजारो लोक कामावर जात येत आहेत. त्यांना कोणी कायमस्वरूपी कार्यालयात ठेवत नाही. तेव्हा आमच्या मोलकरणींनाच का ही अट? ही अट आम्ही मान्य केली तर तसा पगार त्यांना मिळणार का? असाही सवालही रावत यांनी केला आहे. तर सोसायट्यांच्या या अटी आम्हाला अमान्य असल्याचे म्हणत याला जोरदार विरोध त्यांनी केला आहे. तर को-ऑप्रेटिव्ह सोसायटी संघटनेचे अध्यक्ष अॅड. विनोद संपत यांनीही याला विरोध केला आहे. काही दिवसापूर्वीच उपनिबंधकांनी परीपत्रक काढत मोलकरणींना येण्यास सोसायटीला मज्जाव करता येणार नाही, असे निर्देश दिले आहेत. तेव्हा असे विविध फर्मान काढत सोसायट्या याचा भंग करत आहेत. त्यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप संपत यांनी केला आहे.